कॅनडामधल्या सर्वात मोठ्या म्युझिक फेस्टिव्हलकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी किलडिअर पक्ष्याच्या घरट्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागणार की काय अशा चर्चा होत्या. येत्या ५ जुलैला हा कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. मात्र कार्यक्रमाची तयारी करताना मुख्य स्टेजपासून काही दूर अंतरावर किलडिअर पक्ष्याची अंडी काही कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडली, या देशात कायद्यानं या पक्ष्यांना संरक्षण दिल्यानं त्यांच्या घरट्याला लावण्याची परवानी कोणालाही नाही. त्यामुळे या अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याची प्रतिक्षा आयोजकांसह ३ लाख संगीतप्रेमी करत होते. आता मात्र घरट्यातील चारपैकी ३ अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानं चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. पण अजूनही एका अंड्यातून पिल्लू बाहेर आलं नसल्यानं सगळ्यांचं लक्ष येथे लागून आहे. कारण या पिलाच्या जन्मावरच सर्वात मोठ्या म्युझिक शोचं भविष्य ठरणार आहे.

ज्या मैदानात कार्यक्रम होणार आहे त्या मैदानात गेल्याच आठवड्यात काही कर्मचाऱ्यांना या दुर्मिळ पक्ष्याचं घरट आढळलं होतं. कॅनडाच्या वन्यजीव कायद्याप्रमाणे या पक्ष्याला विशेष संरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे या पक्ष्याची शिकार करणं तर दूरच राहिलं पण त्याची अंडी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठीही आयोजकांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार होती. ही परवानगी मिळेपर्यंत हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आला होता. तसेच घरट्याला सुरक्षा देण्यासाठी येथे २४ तास सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले होते.

जर सरकारनं परवानगी दिली असती तर हे घरटं मुख्य स्टेजपासून ३० मीटरपर्यंत हलवण्यात येणार होतं. दर वीस मिनिटांनी घरटं मुख्य जागेपासून काही इंच हलवून ते नवीन जागेपर्यंत न्यायचं असा बेत होता. जर या घरट्याला मानवाचा स्पर्श झाला किंवा घरट्याची जागा हलवण्यात आल्याचं या पक्ष्याच्या लक्षात आलं असतं तर मादीनं कायमस्वरूपी ते घरटं आणि अंडी तशीच सोडून दिली असती. म्हणूनच घरटं हलवण्यासाठी परवानगी मिळणं जवळपास अशक्यच होतं.

मात्र शनिवारी संध्याकाळी चारपैकी ३ अंड्यातून पिल्लं जन्माला आली आणि आयोजकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता सर्वांनाच चौथ्या अंड्यातूनही पिल्लू बाहेर येण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.