तामिळनाडूच्या तीन महिलांवर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय. कोट्टाराई डॅममध्ये चार तरुण बुडत असल्याचं पाहून या तीन महिलांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रसंगावधान दाखवत आपल्या साड्या काढून पाण्यात फेकल्या. विशेष म्हणजे त्यांना दोन तरुणांना वाचवण्यात यशही आलं. पण, दुर्दैवाने अन्य दोघांना त्या वाचवू शकल्या नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला.

न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ६ ऑगस्ट रोजी सिरुवच्चूर गावातील १२ तरुणांचा एक ग्रुप क्रिकेट खेळण्यासाठी कोट्टाराई गावात गेला होता. खेळून झाल्यानंतर ते आंघोळ करण्यासाठी कोट्टाराई डॅममध्ये घेले. पण, गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे डॅममधील पाण्याची पातळी वाढली होती. सेंथमिज सेल्वी (३८), मुथमल (३४) आणि अनंतवल्ली (३४) या तीन महिला त्यावेळी जवळच कपडे धुवत होत्या.

“ते तरुण आले तेव्हा आम्ही निघायच्या तयारीत होतो. त्यांनी आम्हाला डॅममध्ये पोहण्याबाबत विचारणा केली. आम्ही त्यांना पाणी खोल असू शकतं असं सांगत सतर्कही केलं. नंतर पाण्यात उतरल्यावर त्यांच्यातल्या चौघांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडायला लागले. त्यांना बुडताना पाहून कसलाही विचार न करता आम्ही आमच्या साड्या काढून पाण्यात फेकल्या. त्यामुळे दोन जणांना वाचवण्यात आम्हाला यश आलं, पण दुर्दैवाने अन्य दोघं बुडाले. त्या दोघांचा शोध घेण्यासाठी आम्ही पाण्यातही गेलो पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पाण्यात शोधूनही ही दोन मुलं सापडली नाहीत”, असं सेंथमिज सेल्वी या महिलेनं सांगितलं.

या घटनेत कार्तिक आणि सेंथिवेलन या दोन तरुणांना वाचवण्यात यश आलं, तर पविथ्रन (वय १७) आणि रंजिथ (वय २५) या दोघांचा मृत्यू झाला. नंतर पेरंबलूर जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावरुन दोघांचे मृतदेह शोधले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, प्रसंगावधान दाखवत अंगावरच्या साड्या फेकून दोघा तरुणांचे प्राण वाचवणाऱ्या तिन्ही महिलांचं  सर्व स्तरातून कौतुक होत आहे.