सध्या करोनाने सगळ्या जगाला ग्रासलं आहे. अशात पोलीस, डॉक्टर्स हे आपले करोना योद्धे ठरत आहेत. मुंबई पोलिसांना करोनाशी लढण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलाने कप केक विकून ५० हजारांची मदत केली आहे. त्यासंदर्भातला एक व्हिडीओ आणि ट्विट मुंबई पोलिसांनी ट्विट केलं आहे. तसंच या कबीरलाही त्यांनी करोना वॉरियरची उपमा दिली आहे.

काय म्हटलं आहे या व्हिडीओत?
तुम्हाला वाटत असेल की कबीर हे कप केक स्वतःसाठी बनवतोय आणि खातोय. मात्र हे कप केक त्याने तयार केले.. ते एका उद्योजकाला विकले. त्यातून त्याला चॅरिटी म्हणून १० हजार रुपये येणं अपेक्षित होतं. मात्र या उद्योजकांने त्याला ५० हजार रुपये दिले. हे ५० हजार रुपये कबीरने मुंबई पोलिसांना मदत निधी म्हणून दिले आहेत. कबीरने केलेली ही मदत केक इतकीच गोड आहे. त्याने दिलेलं हे योगदान अमूल्य आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

या तीन वर्षांच्या कबीरचं मुंबई पोलिसांनी भरभरुन कौतुक केलं आहे. Look What’s Baking ? असा प्रश्न विचारत या तीन वर्षांच्या मुलाचा आणि त्याने तयार केलेल्या केक्सच्या आणि दिलेल्या मदतीचा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. करोनाच्या संकटात प्रत्येकजण अशा प्रकारे मदत देऊ शकत नाही. मात्र प्रत्येकजण आपल्या परिने मदत करतो आहे. या मुलाने केलेली मदत महत्त्वाची आहे असंही म्हटलं गेलं आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरलही झाला आहे.