जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या सहा लाखांहून अधिक झाली असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीकेमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत आहे. जगभरात करोनाचे पहिले १० लाख रुग्ण होण्यास तीन महिन्याचा कालावधी लागला होता. १०० तासांमध्ये जगभरात करोनाने १० लाख नवे रुग्ण आढळून आल्याने करोनाचा संदर्भातील चिंता आणखीनच वाढली आहे. जगभरामध्ये लाखो लोकं करोनावर उपचार घेत आहेत. मात्र हा आजर संसर्गजन्य असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण पूर्ण बरा झाल्याशिवाय त्याला भेटता येत नाही. त्यामुळेच आपल्या जीवलगांना भेटण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र जगभरात दिसून येत आहे. अशातच एक हृदयद्रावक फोटो समोर आला असून या फोटोमध्ये एक तरुण आपल्या करोनाबाधित आईला पाहण्यासाठी चक्क रुग्णालच्या इमारतीवर चढून खिडकीत बसल्याचे दिसत आहे. फ्रान्समधील अल नास या वृत्तपत्राने व्हायरल झालेल्या या फोटोसंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ही घटना पॅलेस्टाईनमध्ये घडल्याचे सांगण्यात येते. येथील एका महिलेला करोनाचा लागण झाल्यानंतर तिला कोवीड रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर कोणालाही तिला भेटण्याची परवानगी नव्हती. असे असले तरी तिचा मुलगा आईला पाहू द्या अशी विनंती डॉक्टरांकडे करत होता. मात्र त्याला परवानगी देण्यात आली नाही. अखेर हा मुलगा रुग्णालयाच्या भिंतीवरुन चढून आईचा वॉर्ड असणाऱ्या खिडकीत बसून तिला न्याहाळत बसायचा. तो रोज अशापद्धतीने आईला पाहण्यासाठी धडपड करायचा.

या तरुणाई आईचा १६ जुलै रोजी मृत्यू झाला. मात्र तोपर्यंत हा मुलगा रोज तिला खिडकीतून पाहायचा. स्थानिक वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या मुलाचे नाव अल-सुवाती असं असून त्याने आपल्या आईला मृत्यूपूर्वी अशाच प्रकारे खिडकीतून शेवटचं पाहिलं होतं. हेब्रोन रुग्णालयामध्ये

जोपर्यंत महिला जिवंत होती, तोपर्यंत तो दररोज खिडकीपाशी येऊन आईला पाहत होता. त्याचा एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. स्थानिक न्यूज वेबसाईट अलनासनुसार बेइट आवा शहरातील पॅलेस्टिनी युवक जिहाद अल-सुवाती याने हेब्रोन रुग्णालयाच्या आयसीयूच्या खिडकीवर चढून आपल्या आईला शेवटचं पाहिलं. या तरुणाईची आई ७३ वर्षांची होती. खिडकीमधून आपल्या आईला पाहणाऱ्या या तरुणाचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

अनेकांनी हा फोटो करोनाचे दाहक वास्तव दाखवतो असं म्हटलं आहे. ६२ हजारहून अधिक जणांनी हा फोटो रिट्विट केला आहे.