भारताची आघाडीची धावपटू हिमा दासने १९ दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पाच सुवर्णपदके जिंकली. आतापर्यंत अशी किमया कोणत्याही भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटूला साधता आली नाही. हिमा दासने स्वप्नवत कामगिरी करत देशवासीयांची मने जिंकली आहे. तिच्या यशाचे सर्वत्रच कौतुक होत आहे. जागतिक वाघ दिनाचे औचित्य साधत कर्नाटकातील बान्नेरघट्टा प्राणीसंग्रहालयाने हिमा दासचा वेगळ्या पद्धतीने सन्मान केला आहे. संग्रहालयातील वाघाच्या बछड्याचे नामकरण हिमा करण्यात आले आहे.

२०१८मधील आशियाई खेळामध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या धावपटू हिमा दासने गेल्या महिनाभरात पोलंड, झेक प्रजासत्ताकसह विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेत कामगिरीचा आलेख उंचावला होता, सलग पाच सुवर्ण पदके मिळविणाऱ्या आसामच्या सुवर्ण कन्येवर कौतुकाचा पाऊसच पडत आहे.

हिमा दासचा सन्मान करण्यात कर्नाटकातील बान्नेरघट्टा प्राणीसंग्रहालयही मागे राहिलेले नाही. जागतिक वाघ दिनाच निमित्त साधून संग्रहालय प्रशासनाने सहा महिन्यांच्या वाघाच्या बछड्याला हिमाचे नाव दिले आहे. प्राणीसंग्रहालयाच्या कार्यकारी संचालक वनश्री विपीन सिंग यांनी या नामकरणाची घोषणा केली. जागतिक वाघदिनी आठ वाघांना लोकांसाठी प्राणीसंग्रहालयातील सफारी भागात सोडण्यात आले होते. यात दोन वाघिणी आणि त्यांचे सात बछडेही होते. दुसऱ्या वाघिणीच्या चार नंबरच्या बछड्याला हिमाचे नाव देण्यात आले आहे. हिमाच्या कामगिरीचा गौरव म्हणून हे नाव दिल्याचे वनश्री सिंग यांनी म्हटले आहे.