भारतामध्ये टिक-टॉकवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये टिक-टॉकची सध्या जोरदार चलती आहे. येथे टिक-टॉक स्टार सध्या प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळेच आता पाकिस्तानी टिक-टॉक स्टार्समध्येही स्पर्धा सुरु झाली आहे. याच स्पर्धेमध्ये आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका टिकटॉक स्टारने चक्क आपला पती मेल्याचा दावा करणारा खोटा व्हिडिओ पोस्ट केला. आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे हे लोकप्रिय टिकटॉकर आदिल राजपूतच्या पत्नीने त्याच्याच अकाऊंटवरुन पोस्ट केलं. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील रहीम यार खान शहरातील शरीदाबाद परिसरात राहणाऱ्या या महिलेने स्वत:चा रडतानाचा व्हिडिओ आपल्या पतीच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला. आपला पती आपल्याला सोडून गेल्याचा दावा तिने या व्हिडिओमध्ये केल्याचे जीओ टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

आदिलच्या पत्नीने स्वत:चा रडतानाचा व्हिडिओ पोस्ट करत आदिलचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे असा दावा केला. या व्हिडिओवर लोकांनी आदिलला श्रद्धांजली अर्पण केली. पाहता पाहता काही मिनिटांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला. काही तासांमध्ये आदिलच्या घरी शेकडो लोकांचे फोन येऊन गेले. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल त्या परिसरातील लोकांना समजल्यानंतर त्यांनी शोक व्यक्त करण्यासाठी आदिलच्या घरी येण्यास सुरुवात केली. आदिल हा पाकिस्तानमधील सर्वात लोकप्रिय टिकटॉक स्टार्सपैकी एक आहे. त्याच्या अकाऊंटला २६ लाख फॉलोअर्स आहेत.

घरी आलेल्या लोकांपैकी कोणीतरी मशिदीच्या भोंग्यावरुन आदिलच्या मृत्यूची घोषणा केली. मात्र नंतर आदिल जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. अनेकांनी आदिलच्या पत्नीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर आणि स्टंटबाजीवर संताप व्यक्त केला आहे. मानवी भावनांचा खेळ या दोघांनी केल्याचा आरोप करत अनेकांनी त्यांना सोशल नेटवर्किंगवरुन सुनावले आहेत. काहींनी तर या दोघांविरोधात कायदेशीरकारवाई करावी अशी मागणी केली आहे.

लोकांचा संताप बघून या दोघांनी नवा व्हिडिओ पोस्ट करत आदिल एकदम ठणठणीत असून घरीच असल्याचे सांगितले. मात्र या व्हिडिओवरही अनेकांनी अशी फसवणूक करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.