टिकटॉकने गेल्या दोन वर्षांत भारतात बस्तान बसवलं. २० कोटी युझर्स असलेल्या या अ‍ॅपचं गुगल प्ले स्टोअरवरचं रेटिंग काही आठवड्यापर्यंत ४.६ एवढं होतं, परंतु नंतर ते रेटिंग १.२ पर्यंत घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक पुन्हा आपली स्थिती सुधारण्याचे खुप प्रयत्न करत आहे. टिकटॉक हे चीनमधील अॅप असल्याचं सांगत भारतातही त्याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. अशा परिस्थितीतच चीनच्या विरोधात कोणी व्हिडीओ तयार करून टिकटॉकवर टाकला तर आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकत असल्याच्या तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावरील स्टार सलोनी गौर हिनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली.

“चीन विरोधात विनोद असलेला माझा एक व्हिडीओ टिकटॉकनं काढून टाकला आहे. जसा देश तसं अॅप. काही बोलण्याचं स्वातंत्र्यच राहिलं नाही,” असं सलोनीनं म्हटलं आहे. यासंदर्भात तिनं एक ट्विट केलं आहे. तिच्या या ट्विटवर अनेक ट्विटर युझर्सनं आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जणांनी तिला हे अॅप डिलीट करण्याचा सल्लाही दिला आहे.

सलोनी गौर हा सोशल मीडियावरील परिचित असलेला चेहरा आहे. सोशल मीडियावरील कॉमेडिअन अशी तिची ओळख आहे. कंगना रणोतवरील व्हिडीओनंतर ती अधिक प्रसिद्ध झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा केल्यानंतरही तिनं त्यावर एक व्हिडीओ शेअर केला होता. सलोनीचा नझमा आपी हे कॅरेक्टर खुप प्रसिद्ध झालं आहे. २०१८ मध्ये तिनं पहिला व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळीच तिचं नझमा आपी हे कॅरेक्टर समोर आलं होतं. एका कुटुंबातील महिला ईद कधी आहे यावरून चिंतेत असते. तसंच ईदमुळे तिला घरातील सर्व कामंही पूर्ण करायची असतात, असं त्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं होतं. तिचा हा व्हिडीओ सर्वांच्या पसंतीस उतरला होता. सोनम कपूरसह अन्य कलाकारांनीही तिच्या या व्हिडीओंची प्रशंसा केली होती.

टिकटॉकनं केला खुलासा

“टिकटॉक हा एक सर्जनशील अभिव्यक्तीसाठी प्लॅटफॉर्म असून, वापरकर्ता आणि वेगवेगळ्या दृष्टीकोणाचं स्वागत करतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही चिथावणी देणारा आणि हिंसक आशय टाळण्यासाठी आम्ही सावधगिरी बाळगत असून, त्यादृष्टीनं कोणत्याही कंटेटबद्दल कठोरपणे समीक्षा केली जाते. ज्या व्हिडीओची चर्चा सुरू आहे. त्या व्हिडीओतील प्रश्न पुनरावलोकन केल्यानंतर पुन्हा कायम ठेवण्यात आला आहे. टिकटॉकच्या वापरकर्त्याला निर्णयावर अपील करण्याचा अधिकार असून, मार्गदर्शक नियमांनुसार त्यावर निर्णय घेतला जातो, असं टिकटॉकनं या व्हिडीओबद्दल म्हटलं आहे.