अॅसिड हल्ल्यावर व्हिडीओ बनवणं टिकटॉक स्टार फैजल सिद्दिकीला चांगलंच महागात पडलं आहे. नेटकऱ्यांनी फैजलवर जोरदार टीका केली असून त्याचं अकाऊंट सस्पेंड करण्याचीही मागणी अनेकांनी केली आहे. महिलांवरील अॅसिड हल्ल्याचं उदात्तीकरण केल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जैसवाल यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. तर टिकटॉक या अॅपने कारवाई करत फैजलचा वादग्रस्त व्हिडीओ अॅपवरून काढून टाकला आहे.

फैजल सिद्दिकी टिकटॉक स्टार म्हणून ओळखला जातो. त्याचे टिकटॉकवर १ कोटी ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या व्हिडीओत तो आधी एका मुलीला धमकी देतो आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर पाणी फेकतो. त्यापुढील दृश्यात मुलीचा विद्रुप चेहरा दाखवण्यात आला. या व्हिडीओतून फैजलने अॅसिड हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्याचं उदात्तीकरण केल्याची टीका करत महिला आयोगाने निषेध व्यक्त केला आहे.

फैजलच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर #BanTikTok आणि #FaizalSiddiqui हे हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होऊ लागले होते. अनेकांनी टिकटॉक या अॅपवरच बंदी आणण्याची मागणी केली.