सोशल मीडिया आला आणि मीडियाच्या वापरामधली अनेक बंधनं दूर झाली. भारतात बसल्याबसल्या आपल्या अमेरिकन शोज् पाहता येऊ लागले. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या पाहता येऊ लागल्या. अनेक क्षेत्रातली अनेकांची मक्तेदारी मोडीत निघाली आणि जगभर माहितीचा मुक्त संचार सुरू झाला. सगळे इंटरनेट यूझर्स अचानक एका समान पातळीवर आले.

पण काही वर्षातच याही क्षेत्रात चढाओढ सुरू झाली. काही गोष्टी स्टेटस सिंबाॅल झाल्या. इंरनेटवरच्या स्टेटस सिंबाॅल असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक आहे ते म्हणजे ट्विटरचं व्हेरिफाईड अकाऊंट. ट्विटरच्या व्हेरिफाईड अकाऊंटमध्ये त्या अकाऊंटच्या बाजूला एक निळं चिन्ह असतं. आणि त्यावरून ते अकाऊंट हे त्या व्यक्तीचं खरंखुरं अकाऊंट असल्याचं कळतं. यामुले डु्प्लिकेट आणि अनधिकृत अकाऊंटचा धोका टळतो.

ट्विटरवर मिळणारं हे व्हेरिफाईड अकाऊंट यापूर्वी सिनेस्टार्स, जगप्रसिध्द व्यक्ती, प्रसिध्द पत्रकार पाॅपस्टार्स अशा सगळ्यांपुरतं मर्यादित होतं. पण आता हे व्हेरिफाईड अकाऊंटचं चिन्ह मिळायचा मार्ग ट्विटरने सगळ्यांसाठी खुला केला आहे.

व्हेरिफाईड अकाऊंटचं हे चिन्ह म्हणजे ट्विटरवरचा स्टेटस सिंबाॅल आहे. तुम्हालाही ते मिळवायचं आहे का? तर या गोष्टी करा.

१. तुमची ट्विटर प्रोफाईल पूर्ण करा. मग यात तुमचं नाव आलं. प्रोफाईल पिक आलं, तुमची माहिती आली. तुमच्या ट्विटर अकाऊंटचा फोटो तुमचाच आहे ना हे पहा. तसंच तुमचं ट्विटर हॅंडल तुमच्या खऱ्या नावाशी साधर्म्य साधणारं आहे की नाही ते पहा. जर तसं नसेल तर एखादं सुटसुटीत ट्विटर हँडल (उपलब्ध असल्यास) निवडा. तुमच्या ट्विटर अकाऊंटचा हेडर फोटोसुध्दा तुमच्याशी संबंधित असेल असा निवडा.

२. ट्विटरच्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन तुमच्या ट्वीट्सची व्हिजिबिलिटी ‘पब्लिक’ करा. आता तुम्ही केलेली ट्वीट्स सगळ्या जगाला दिसतील. तुमचा फोन नंबर ट्विटरच्या माहितीमध्ये फीड करा

३. तुम्हाला ट्विटरने व्हेरिफाय का करावं याचं कारण ट्विटरला द्या. सामान्यत: लोकांवर प्रभाव पाडू शकणाऱ्या व्यक्तीं ‘व्हेरिफाईड अकाऊंट’ पुरवतं. तुम्ही लोकांवर हा प्रभाव कसा पाडू शकाल हे कारण ट्विटरला द्या.

४. तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून एखाद्या सरकारी कागदपत्राची स्कॅन केलेली काॅपी अपलोड करा.

५. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर verification.twitter.com या साईटवर जात तिथला आॅनलाईन फाॅर्म भरत व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करा.
ट्विटर व्हेरिफिकेशनची ‘ब्लू टिक’ मिळवण तसं मानाचं समजलं जातं. पण यामुळेच ती टिक मिळवणं हे कठीण असतं. वर दिलेली प्रक्रिया पूर्ण करून ही ‘ब्लू टिक’ तुम्हाला मिळेलच असं नाही. व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करणं चांगलंच. पण ते मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी आधी ट्विटरवर अॅक्टिव्ह होणं खूपच महत्त्वाचं आहे.