काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा गुजरातमधील झंझावाती प्रचार सध्या वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मिनी बसमधून राहुल यांचा रोड शो सुरू असताना एक तरूणी सेल्फी काढण्यासाठी थेट बसच्या टपावर चढली. अर्थात तिथे जमलेल्या अनेकांनी हा प्रसंग कॅमेरात कैद केला. फक्त एका सेल्फीसाठी एवढा खटाटोप करणारी ही मुलगी आहे तरी कोण याबद्दल अनेकांना कुतूहल होतं.

या मुलीचं नाव मंताशा असल्याचं समज आहे. मंताशा दहावीत शिकते. ती राहुल गांधींची खूप मोठी चाहती आहे. त्यांना भेटण्यासाठी आणि एक सेल्फी काढण्यासाठी तिने आपला वर्ग बुडवला होता. वडिलांकडून परवानगी घेऊन ती राहुल गांधींच्या ‘रोड शो’ला आली होती. राहुल गांधींची एक इलक पाहण्यासाठी ती ताफ्याच्या मागे मागे फिरत होती. शेवटी राहुल गांधींना भेटण्याची तिची इच्छा पूर्ण झाली. गर्दीतून वाट काढत मंताशा राहुल गांधींपर्यंत पोहोचली. गाडीच्या टपावर चढण्यासाठी राहुल गांधींनी तिला मदत केली. सेल्फी घेऊन झाल्यानंतर मंताशा खाली उतरली. पुष्पगुच्छ देऊन तिनं राहुल यांचे आभार मानले आणि आगामी निवडणुकांसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.

ऐकावे ते नवल! जास्त काम करतो म्हणून कर्मचाऱ्याला कामावरून काढलं

मंताशा ही एका काँग्रेस कार्यकर्त्याची मुलगी आहे. ती राहुल गांधींना आपला आदर्श मानते. राहुल गांधींना भेटून माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली असंही ती यावेळी म्हणाली.