रिलायन्स जिओने ‘जिओ समर सरप्राईज्’ ही नवी योजना आणून ग्राहकांना खूश केले आहे. रिलायन्स प्राईम जिओमध्ये सहभागी होण्याची शेवटची मुदत ही वाढवून १५ एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. या योजनेद्वारे १५ एप्रिलच्या आत जिओ प्राईमच्या ३०३ रूपयांच्या किंवा त्याहून अधिक किंमत असणाऱ्या प्लॅन्सची खरेदी करणाऱ्या जिओ प्राईमच्या सभासदांना ही सर्व्हिस आणखी ३ महिने मोफत मिळणार आहे.
जिओ समर सरप्राईज् चा फायदा
जिओच्या या योजनेमुळे प्राईम ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, फ्री SMS सेवा, फ्री 4G डाटा यासारख्या अनेक सुविधा पुढचे तीन महिन्यांपर्यंत उपभोगता येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना आता एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत या सेवांचा मोफत लाभ घेता येणार आहे.
* ज्यांनी १५ एप्रिलच्या आधी जिओची प्राइम मेंबरशिप घेतली आहे आणि ज्या ग्राहकांनी याचबरोबर ३०३ चा रिचार्ज केला आहे त्यांना ५ जीबी मोफत डेटा मिळणार आहे.
* ४९९ चे किंवा त्यापेक्षा अधिकचे रिचार्ज करणा-या ग्राहकांना १० जीबी मोफत फोरजी डेटा मिळणार आहे.
* ज्या ग्राहकांनी फक्त ९९ रुपये भरून जिओ प्राईममध्ये सहभागी झाले आहेत त्यांना या समर सप्राईजचा लाभ घेता येणार नाही त्यासाठी ३०३ रुपयांचे रिचार्ज करणे गरजेचे आहे.
३०३ च्या रिचार्जचे काय होणार?
ज्यांनी याआधीच ३०३ रुपयांचे रिचार्ज केले आहे त्यांना तीन महिने मोफत सेवांचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा जूनमध्ये संपल्यानंतर त्यांचे ३०३ रुपयांचे रिचार्ज हे जुलै महिन्यात अॅक्टीव्हेट होणार आहे.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जाहीर केलेल्या प्रेस रिलीजनुसार जिओ प्राईमचे आतापर्यंत ७.२ कोटी ग्राहक झालेले आहेत. जिओ प्राईमच्या मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कंपनीने जिओ प्राईममध्ये सामील होण्याची मुदत वाढवली आहे. सप्टेंबर महिन्यात रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ च्या सेवेची मोठ्या धूमधडाक्यात सुरूवात केली होती. त्यानंतर अनेक महिने ‘जिओ’ची सर्व्हिस संपूर्णपणे मोफत होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 12:32 pm