धकाधकीच्या जीवनामध्ये नैराश्य, नकारात्मक विचार किंवा ताण-तणाव या गोष्टींना प्रत्येकालाच सामोरं जावं लागतं. त्यातच बरेच जण म्हणतात की, चिंता किंवा ताण हा फक्त मनुष्य जातीच्याच वाट्याला आहे. परंतु असं नाहीये. प्राण्यांनाही बऱ्याच वेळा तणावाला समोरं जावं लागतं. त्यामुळेच रशियातील एका  फार्ममध्ये एक नामी शक्कल लढविली आहे. गायींना तणावमुक्त ठेवण्यासाठी त्यांनी VR Headsets तयार केले आहेत.

प्राण्यांना देखील ताण-तणावासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. तसंच गायींच्या बाबतीत होतं. ज्यावेळी गायी चिंतेत किंवा तणावग्रस्त असतात त्यावेळी त्याचा परिणाम त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर होतो. त्यामुळेच गायींना तणावमुक्त करण्यासाठी काही इंजिनिअर्स आणि डिझायनर्सने नवीन व्हीआर हेडसेट तयार केला.

रशियामधील रसमोलोको या फार्ममध्ये गायींच्या डोक्यावर व्हीआर हेडसेट्स लावण्यात आले आहेत. हा हेडसेट खासकरुन गायींसाठीच तयार करण्यात आला आहे.  हा हेडसेट तयार करण्यासाठी इंजिनिअर्स आणि डिझाइनर्सनी बराच वेळ शेतकऱ्यांसोबत व्यतीत केला आणि गायींविषयी प्रत्येक लहानसहान गोष्ट जाणून घेतली. त्यानंतर हा हेडसेट तयार करण्यात आला. सुरुवातीला हा हेडसेट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याची खिल्ली उडविली. मात्र त्यानंतर गायींमध्ये जो बदल झाला तो साऱ्यांनी अनुभवला.

या हेडसेटमध्ये काही फोटो सेट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये गायींना हिरवीगार शेतं, निसर्गरम्य ठिकाणं आणि उत्तम वातावरण दिसून येतं. त्यामुळे गायींची मनस्थिती सुधारते आणि त्या आनंदी राहतात. विशेष म्हणजे याचाच परिणाम गायींच्या दूध देण्याच्या क्षमतेवर झाला आहे.