टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरु असून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येकजण नीरज चोप्राच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारावले आहेत. सोशल मीडियावर नीरज चोप्राचं कौतुक करणाऱ्या पोस्ट, ट्वीटस पडत आहेत. सुवर्णयशाचा ‘भालेदार’ २३ वर्षीय नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने एकंदरीतच इतिहास घडवला.

ऑलिम्पिकचा ‘गोल्डन बॉय’ नीरज मराठ्यांचा वंशज; पूर्वज लढले होते पानिपतच्या युद्धात

दरम्यान नीरज चोप्राने २०१६ मध्ये अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. नीरज चोप्राने वयाच्या १८ व्या वर्षी आयएएएफ वर्ल्ड-अंडर २० अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. पण त्यावेळी साक्षी मलिक आणि पी व्ही सिंधू यांच्या कांस्य आणि रौप्यपदकामुळे नीरच चोप्राचं हे यश दुर्लक्षित झालं होतं. पण त्यावेळी त्याचं काहीजणांनी अभिनंदन केलं होतं ज्यामध्ये फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गदेखील होते. मार्क झुकरबर्गने सोशल मीडियाच्या माध्यमातून नीरज चोप्राचं अभिनंदन केलं होतं.

नक्की पाहा हे फोटो >> …अन् गोल्ड मेडल नीरजच्या गळ्यात; डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावेत असे ‘सुवर्ण’क्षण

त्यावेळी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नीरज चोप्राने याबद्दल खुलासा केला होता. वयाच्या १८ व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन होऊन कसं वाटतं असं विचारण्यात आलं असता त्याने उत्तर दिलं होतं की, “मला सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदनाचा मेसेज आला होता. त्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री, राज्यवर्धन राठोड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि शिखर धवन यांचे मेसेज आले होते. याशिवाय फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, शिल्पा शेट्टी आणि कतरिना कैफ यांनीदेखील मेसेज केला होता. पण जेव्हा पोडियमवर उभा राहिलो होतो तो सर्वात आनंदी क्षण होता. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं”.

तेरा वर्षांनंतर…

भारताचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक मिळवण्याचा पराक्रम केला. १३ वर्षांनी भारताच्या खात्यात ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नोंद झाली.

जन गण मन… १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये वाजलं भारताचं राष्ट्रगीत; Video पाहताच अंगावर काटा येईल

सर्वोत्तम कामगिरी…

भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दौन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदकांवर नाव कोरले होते.