स्वीडनमधलं सर्वात प्रसिद्ध ‘आयकिया’ स्टोअर हैदराबादमध्ये सुरू झालं आहे. थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे देशातील विक्री क्षेत्रात व्यवसायास आयकियानं पहिली परवानगी मिळवली. पाच वर्षांनंतर ‘आयकिया’च्या व्यवसायाला सुरुवात झाली. खरं तर या जगप्रसिद्ध कंपनीनं आपला पहिला व्यवसाय सुरू करण्यासाठी हैदराबाद निवडलं म्हणून इथली लोक खूपच खूश आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी या स्टोअरला भेट देण्यासाठी ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडाली. पहिल्याच दिवशी जवळपास ४० हजार लोकांनी या स्टोअरला भेट दिली.

या स्टोअरच्या एका मजल्यावर १ हजार लोक बसू शकतील एवढं मोठं रेस्टराँ देखील आहे. या स्टोअरबद्दल स्थानिकांना प्रचंड कुतूहल होतं त्यामुळे पहिल्याच दिवशी हजारो ग्राहक ‘आयकिया’च्या स्टोअरमध्ये आले. गुरूवारी संध्याकाळी हैदराबादमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असंही ट्विट एका रेडिओ जॉकीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं. त्यानंतर अल्पावधितच या वाहतूक कोंडीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.

‘आयकिया’चं स्टोअर कायमस्वरूपीच हैदराबादमध्ये राहणार आहे त्यामुळे इतक्या तातडीनं भेट देण्याची गरज नाही अशा अनेक उपहासात्मक टीका होत आहेत. हैदराबादमधल्या दालनासाठी १३ एकर जागेवर ४ लाख चौरस फूट बांधकाम करण्यात आले असून, या मार्फत ९५० प्रत्यक्ष, तर १,५०० अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. कंपनीने या दालनासाठी १,००० कोटी रुपयांसह आतापर्यंत ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. २०२५ पर्यंत २५ दालने सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केलेल्या आयकियाला २०१३ मध्ये १०,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास परवानगी मिळाली होती. कंपनीचे पहिले दालन २०१७ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते मात्र त्याला काही कारणानं उशीर झाला.