रस्त्यावरून चालताना पाऊस आला की आपण पावसापासून रक्षण करण्यासाठी पटकन छत्री उघडतो किंवा रेनकोट घालतो. तसं चालता फिरता हे सगळं करणं शक्य आहे पण तुम्ही कधी छत्री घेऊन ट्रेन चालवताना मोटरमनला पाहिलंत का? मग हे पाहाच. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मोटरमन ट्रेनच्या इंजिनमध्ये छत्री उघडून बसला आहे. ट्रेनचं छत गळत असल्यानं पावसाचं पाणी आत येत होतं. पाण्यामुळे कंट्रोल पॅनल खराब होऊ नये म्हणून मोटरमनने एका हातात छत्री पकडली होती आणि दुसऱ्या हातानं तो यंत्रणा हाताळत होता.

एका प्रवाशानं रेल्वे प्रशासन आणि सुरेश प्रभुनां ट्विट करत ही भयंकर परिस्थिती लक्षात आणून दिली. गेल्या कित्येक वर्षांपासून असा त्रास सहन करावा लागत आहे, पण आता याची सवय झालीय अशी माहिती मोटरमननं  दिली. हा व्हिडिओ झारखंडमधला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं यावर उत्तर दिलंय. हे इंजिन बंद झालंय आणि ते दुसऱ्या इंजिनचा आधार घेऊन वाहून नेण्यात आलंय असं व्हिडिओत दिसतंय, पण याप्रकरणात आम्ही लक्ष घालू असं ट्विट रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय.