पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये मेट्रोच्या उद्घाटनसाठी येणार आहे. आज सकाळीच नरेंद्र मोदी सकाळी दिल्लीहून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. आपल्या एका दिवसाच्या दौऱ्यात मोदी ४१ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या प्रकल्पांची घोषणा करणार आहेत. दोन दिवसांपासूनच कल्याण शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. एकीकडे असेच चित्र असतानाच दुसरीकडे आज लोकल ट्रेनच्या प्रवाशांनी मोदींच्या या भेटीमुळेच लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावत असल्याचा तर्क लावला आहे. लोकप्रिय एम इंडिकेटर अॅप्लिकेशनमधील लाइव्ह चॅट सेक्शनपासून ऑफिसांमध्येही याचीच चर्चा आहे.

पावसाळ्यामध्ये पाणी तुंबल्याने लेट असणाऱ्या लोकल गाड्या मागील काही वर्षांपासून दाट धुक्यांचे कारणामुळे हिवाळ्यातही वेळापत्रकाच्या पटरीवरून उतरल्याच्या पहायला मिळत आहेत. मात्र आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांना अगदी वेळत ट्रेन धावत असल्याने आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याचे सोशल मिडियावरील पोस्टवरून दिसून येत आहे. खासकरुन सकाळच्या सुमारास म्हणजेच पहाटेपासून साडे नऊपर्यंत या पीक अवर्समध्ये ट्रेन वेळेत असल्याने अनेकांनी एम इंडिकेटवर सांगितले आहे. बऱ्याच जणांनी थेट याचा संबंध आज मोदींच्या कल्याण दौऱ्याशी लावला आहे. 

काहींनी तर आपण १० दिवसांनंतर वेळेत ऑफिसला पोहचल्याचे मत नोंदवले आहे.

विशेष म्हणजे केवळ मध्यच नाही तर पश्चिम रेल्वेच्या गाड्याही वेळत असल्याचे एमइंडिकेटवरील चॅटवरून दिसत आहे. काही जणांनी मोदी आल्यामुळे आज केवळच दोनच मिनीट ट्रेन लेट असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

अभिनंदनाचा तो मेसेज आज एमइंडिकेटवरील सर्वात आवडत्या मेसेजस पैकी एक आहे

याशिवाय फेसबुकवरही काहीजणांनी रेल्वे वेळेवर असण्याचा संबंध थेट मोदींच्या भेटीशी जोडत, मोदी येण्याने रेल्वे वेळत चालत असतील तर त्यांनी वरचेवर मुंबईमध्ये यावे असे मत नोंदवले आहे. त्यापैकीच ही एक बोलकी प्रतिक्रिया.

दरम्यान नियोजित वेळेनुसार सकाळी मुंबईत दाखल झालेले मोदी दोन ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर दुपारी ते हेलिकॉप्टरने कल्याणला रवाना होतील. ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे आणि अल्प उत्पन्न गटासाठीच्या गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजनही नरेंद्र मोदींच्या हस्ते कल्याणमध्ये होईल. संध्याकाळी नरेंद्र मोदी पुण्याला रवाना होतील. भिवंडी-कल्याण या मेट्रोसाठी निविदा काढण्यात आलेली नसतानाही या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.