प्लास्टिक आणि त्यापासून होणारा कचार हा अनेक पर्यावरण प्रेमींबरोबरच सर्वांसाठीच महत्वाचा प्रश्न आहे. मागील काही वर्षांपासून प्लास्टिकचा कमी वापर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात सुरुवात केली आहे. प्लास्टिकचा वापर कमी करुन आपल्याला पर्यावरण संरक्षणाच्या कामाला हातभार लावता येईल अशा पद्धतीने यासंदर्भात जागृती केली जात आहे. जगभरामध्ये वापरण्यात येणाऱ्या बहुतांश प्लास्टिकच्या वस्तू या विघटन न होणाऱ्या आहेत. म्हणजेच एकदा का त्या वस्तूचा वापर संपला की ती फेकून दिल्यावर अनेक वर्ष त्या वस्तूचे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात कारण ती नैसर्गिक वस्तूंप्रमाणे पर्यावरणात विघटीत होत नाही. मागील अनेक दशकांपासून प्लास्टिकचा पर्यावरणार होणार वाईट परिणाम जगभरामध्ये वेगवगेळ्या घटनांमधून दिसून येत आहे. समुद्रातही मोठ्याप्रमाणात प्लास्टिकचा कचरा असून आता समुद्रामधील प्लास्टिक ही सुद्धा मोठी समस्या मानवासमोर निर्माण झाली आहे.

मात्र प्लास्टिकच्या याच भस्मासुरावर उपाय म्हणून पुनर्प्रक्रिया म्हणजेच प्लास्टिक रिसायकलिंगकडे पाहिले जात आहे. प्लास्टिक रिसायकलिंगच्या माध्यमातून या समस्येवर उपाय शोधता येईल याबद्दल अनेक पर्यावरण तज्ज्ञ आशावादी आहेत. एकदाच वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या गोष्टी पुन्हा वितळवून त्यापासून नव्या गोष्टी निर्माण करण्यास मागील काही वर्षांपासून जगभरामध्ये सुरुवात झाली आहे. आज रिसायकलिंगकडे एक मोठा उद्योग म्हणून पाहिलं जात आहे. असाच एक हटके उद्योग ऑस्ट्रेलियातील एका पिता पुत्राच्या जोडीने सुरु केला आहे. निकी रॉबिन्सन या व्यक्तीला आपण राहत असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत असून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचे वाटले. त्यामधून त्याला एकदा वापरुन फेकून देण्यात येणाऱ्या बाटल्यांपासून सनग्लासेस तयार करण्याची कल्पना सुचली आणि त्याने ती प्रत्यक्षातही आणली. विशेष म्हणजे आपल्या मुलाकडून म्हणजे हॅरीकडून यासंदर्भात प्रेरणा मिळाल्याचं निकी सांगतो.

निकी ६०० एमएलच्या सिंगल यूज प्लास्टिक बॉटलपासून म्हणजेच युज अॅण्ड थ्रो तत्वावर बनवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून सनग्लासेस बनवतो. विशेष म्हणजे हे सनग्लासेस तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत. माझ्या ९ वर्षाचा मुलगा हॅरी हा पर्यावरणासंदर्भात शिकत असतानाच मला या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून सनग्लासेस बनवण्याची कल्पना सुचली असं निकी सांगतो.

या दोघांनी आपल्या या रिलायकल्ड सनग्लासेस ब्रॅण्डचे गुड सिटीझन्स असं नाव ठेवलं आहे. बाटल्यांपासून सनग्लासेस कसे बनवता येतील यासंदर्भात निकीने दोन वर्ष संशोधन आणि वेगवेगळ्या चाचण्या केल्याचे ‘टाइम्स नाऊ’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. “हे काम वाटतं तितकं सोपं नाहीय. यासाठी मला दोन वर्ष संशोधन आणि चाचण्या कराव्या लागल्या. आम्ही मस्करीने या काळाला आमचा प्रयत्न करा सुधरा असा काळ होता असं म्हणतो. अनेकदा मी कारखान्यातून घरी येताना गाडी बाजूला लावून एकटाच रडायचो. कारण आम्हाला अनेकदा अशा समस्या आल्या की त्यांची उत्तर आम्हाला लवकर सापडत नव्हती. मात्र रिसायकलिंगवर आधारित उद्योगच सुरु करण्यावर आम्ही ठाम होतो. १०० टक्के रिसायकलिंगवर आधारित उद्योगाचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं,” असं आपल्या संघर्षाच्या काळासंदर्भात बोलकाना निकी सांगतो.

गुड सिटीझनच्या वेबसाईटनुसार त्यांचे प्रोडक्ट हे १०० टक्के रिसायकलिंगच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहेत. प्रत्येक गिऱ्हाईकामागे कंपनी समुद्रामधून १ किलो घातक प्लास्टिक कचरा बाहेर काढते असंही वेबसाईटवर म्हटलं आहे. “आम्ही आमच्या कंपनीमध्ये १०० टक्के रिलायकलिंगच्या माध्यमातून बनवलेले सनग्लासेस तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक प्रोडक्टसाठी आण्ही समुद्रातून एक किलो कचरा बाहेर काढण्यासाठी कटीबद्ध आहोत,” असं वेबसाईटवर म्हटलं आहे.