विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांतील स्पर्धांमुळे सध्या रेल्वेच्या एसी तिकीटासाठी जेवढे पैसे लागतात तेवढ्याच पैशांमध्ये विमान प्रवास करता येणं शक्य झालं आहे. पण आता इंडिगो आणि स्पाइस जेट यांसारख्या देशातल्या महत्त्वाच्या कंपन्यांनी वेब चेक-इनसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरूवात केली. परिणामी विमान प्रवाशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, यावरुनच भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागाने विमान कंपन्यांची टर उडवली आहे.


इंडिगो वेब चेक-इनसाठी 100 रुपये आणि स्पाइस जेट यासाठी 99 रुपये शुल्क आकारणार आहे. यावरुन पश्चिम रेल्वेने विमान कंपन्यांवर निशाणा साधला आहे. वेब चेक-इनसाठी अतिरिक्त पैसे देण्याची किंवा विमानतळावर चेक-इन करताना मोठमोठ्या रांगांमध्ये उभं राहण्याची काय गरज?. त्यापेक्षा स्वस्त आणि मस्त भारतीय रेल्वेनेच प्रवास करा असा सल्ला पश्चिम रेल्वेने दिला आहे. वेब चेक-इनची आवश्यकता नाही की मोठमोठ्या रांगेचीही नाही. याशिवाय तुमची आसनं देखील आधीच आरक्षीत केलेली असतात, तिकीटांचे दरही खूप कमी आहेत मग कशाला विमानाने प्रवास करायचा? अशा आशयाचं ट्विट पश्चिम रेल्वेने केलं आहे.

दुसरीकडे, केंद्रीय नागरी उड्डयाण मंत्रालयाने विमान कंपन्या वेब चेक-इनसाठी अतिरिक्त पैसे घेत असल्याची दखल घेतली आहे. विमानकंपन्या वेब चेक-इनसाठी अतिरिक्त पैसे आकारत असल्याचं आम्हाला समजलं आहे. अशाप्रकारे अतिरिक्त पैसे आकारणे हे नियमांनुसार आहे की नाही याबाबत आम्ही चौकशी करु असं ट्विट नागरी उड्डयाण मंत्रालयाने केलं आहे.