पुष्कर सामंत

मार्च महिन्याच्या अखेरीपासून हळूहळू वातावरणात उन्हाची झळ बसू लागली आहे. वातावरणात एक उष्णता जाणवायला लागली आहे. त्यामुळे या काळात शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. साधारणपणे या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच माहित असतं. मात्र या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा केवळ शरीरालाच नाही तर तुमच्या स्मार्टफोनलाही बसत असतात. त्यातच सध्या देशात २१ दिवसांचा लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक तरुणाई तिचा वेळ मोबाईलवर गेम खेळण्यात किंवा चित्रपट, वेबसीरिज पाहण्यात घालवत . त्यामुळे मोबाईलची बॅटरीदेखील बऱ्याच वेळा गरम होते. त्यामुळे या दिवसांमध्ये स्मार्टफोनची काळजी कशी घ्यावी हे पाहुयात.

स्मार्टफोन्सचं गरम होणं हे काही ऋतुमानानुसार बदलत नसतं. त्यांच्या उष्णतेची कारणं वेगवेगळी असतात. पण स्मार्टफोन, मग तो कुठल्याही कंपनीचा असो, गरम होत असतो. सगळेच स्मार्टफोन्स कमी अधिक प्रमाणात गरम होत असतात. त्यात काही एखाद्या ब्रॅण्डचा किंवा मॉडेल सीरिजचा दोष असतो अशातला भाग नाही. अनेकदा एखादं मॉडेल गरम होतं हे त्यातल्या दोषांमुळे.

स्मार्टफोन गरम कसा होतो?

प्रोसेसरवरचा ताण – स्मार्टफोन गरम होण्यात मोबाइल बॅटरीचा मोठा हात असावा असं अनेकांना वाटतं. त्यात चूक काही नाही. मोबाइलच्या वापरामुळे, चाìजग करताना बॅटरीही गरम होत असतेच. (थोडीशी गरम होणं आणि चटका लागण्याइतकी तापणं यात फरक आहे. बॅटरी तापत असेल तर हार्डवेअरमध्ये दोष असू शकतो.) पण खरी गोम ही स्मार्टफोनच्या मेंदूत आहे. भरमसाट अविरत काम केल्यानंतर आपलं डोकं आणि पर्यायाने मेंदू जसा गरगरायला लागतो तसंच मोबाइलच्या बाबतीतही घडतं. कुठल्याही प्रख्यात कंपनीच्या प्रोसेसरवर सतत कार्यरत राहिल्याने ताण येत असतो. याचीच परिणती ही मोबाइलचा मदरबोर्ड गरम होण्यात होते. आणि पर्यायाने मग संपूर्ण स्मार्टफोन गरम झाल्याचं जाणवतं.

अ‍ॅप्सचा ओव्हरलोड – एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स सुरू असणं हे तर स्मार्टफोन गरम होण्याचं, हँग होण्याचं हमखास कारण आहे. युजरच्या नकळत बॅकग्राऊंडला सुरू असणाऱ्या अ‍ॅप्समुळे बॅटरीवर आणि एकूणच स्मार्टफोनच्या कार्यक्षमतेवर ताण पडतो.

 रेंजचा प्रॉब्लेम – जिथे मोबाइल नेटवर्कला चांगली रेंज असेल, उत्तम सिग्नल असेल तिथे मोबाइलचं काम व्यवस्थित सुरू असतं. पण जिथे सिग्नल खराब असतो तिथे स्मार्टफोनची कसोटी लागते. फोनचा अँटेना हा सतत रेंजचा शोध घेत बसतो. फोन स्लीपमोडवर जरी असला तरी अ‍ॅक्टिव्ह म्हणजेच कार्यरत असतो. त्यामुळे बॅटरी तर खर्च होतेच पण फोनही गरम होतो.

आजूबाजूचं तापमान – हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. वातावरणातलं तापमान जास्त असताना मोबाइल थंड राहील अशी अपेक्षा बाळगणं फोल ठरेल. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही पण हे वास्तव आहे. भारतासारख्या देशात बहुतांश भागात ३५ ते ३८ डिग्री इतकं तापमान असतं. अशा तापमानाचा बॅटरी लाइफवर परिणाम तर होत असतोच. पण फोन बाहेरून गरम होणंही साहजिकच असतं. तरीही ३८ ते ४० डिग्री तापमानामध्ये फोन व्यवस्थित काम करतो. अर्थात कुठलीच कंपनी ठामपणे हे सांगत नसते. पण साधारण याच रेंजमध्ये स्मार्टफोन नीट काम करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर अ‍ॅपलचा आयफोन ६ हा ० ते ३५ डिग्रीमध्ये उत्तमरित्या काम करू शकतो असं म्हटलं जातं.

सदोष हार्डवेअर – मॅन्युफॅक्चरिंगमध्येच दोष असण्याची शक्यता फार धूसर असते. पण नाकारता येत नाही. अनेकदा फोन आणल्या दिवसापासून गरम होत असल्याच्या तक्रारी सुरू असतात. अशा केसेसमध्ये फोन रिप्लेस करून घेणं उत्तम. सामान्यत: कंपन्या फोन रिप्लेस करून देतात.
थोडक्यात काय तर स्मार्टफोन हे एक कुल गॅजेट आहे. त्यामुळे त्याला कुल ठेवलं तर आपणही तितकेच कुल राहू.

स्मार्टफोनला कुल कसं करायचं किंवा ठेवायचं?

 ब्रेक घ्या -ऑफिसमध्ये काम करतानाही आपण ठरावीक वेळानंतर ब्रेक घेत असतो. स्मार्टफोनलाही ब्रेक द्या. प्रोसेसरची घरघर आणि गरगर थोडा वेळ थांबू द्या.

स्मार्टफोनला मोकळा श्वास घेऊ द्या – अनेक स्मार्टफोन्सना घालण्यात येणाऱ्या कव्हर्स, बॅटरी केसमुळे व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम मोबाइलला होत असतो. लॅपटॉप, कम्प्युटर्स, टीव्ही यांना व्हेंटिलेशन असतं. पण स्मार्टफोन्सना कव्हर घातल्याने गरम हवा बाहेर जाण्याचा मार्गच बंद होतो. अशा वेळी काही वेळापुरतं कव्हर काढून ठेवा.

ओरिजिनल चार्जर – अर्थात मोबाइल विकत घेताना येणारा चार्जर हा ओरिजिनलच असतो. पण काही वेळा तो बिघडल्याने नवीन चार्जर विकत घेण्याची वेळ येते. अशा वेळी ओरिजिनल चार्जरच घ्यावा.

चार्जिंग करतेवेळी वापर नको – स्मार्टफोन चार्जिंगला असताना शक्यतो फोनचा वापर टाळा. एकाच वेळी प्रोसेसर आणि बॅटरी गरम झाली तर त्याचा एकत्रित परिणाम हा स्मार्टफोनवर होणारच ना.

pushkar[dot]samant[at]gmail[dot]com