दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश घेऊन येतो. या सणानिमित्तानं कसाऱ्यातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या शेकडो महिलांना रोजगाराची एक संधी मिळाली आहे. या महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी अनेक सेवाभावी संस्था मदत करत आहेत. डोबिंवलीमधल्या विवेकानंद सेवा मंडळानं देखील विहिगावमधल्या असंख्य महिलांना रोजगाराची संधी दिली आहे.

या संस्थेच्या मदतीमुळे गावातल्या १२० हून अधिक महिला सध्या उटणं तयार करत आहेत. मुंबई, ठाणेमधल्या अनेक ऑफिसमध्ये या उटण्यांची विक्री होणार आहे. यातल्या काही महिलांना उटणं तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. योग्य प्रशिक्षण घेतलेल्या महिलांच्या मार्गदर्शनाखाली पाड्यातील महिला उटणं तयार करण्यात व्यग्र आहेत.

यातल्या अनेक महिलांची आर्थिक परिस्थीती ही बेताची आहे. रोजगाराच्या संधीमुळे महिलांना आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न संस्थेनं केला आहे. पूर्वी या महिलांनी मिळून तयार केलेल्या ३५०० ते ४५०० हजार उटण्यांच्या पाकिटांची विक्री होत असे. मात्र यावर्षी २० हजारांहून अधिक उटण्यांच्या पाकिटांची विक्री करणार आहे असा मानसही या महिलांनी बोलून दाखवला.