माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ट्विटरवर नेहमी सक्रिय असतात. त्यांच्या हजरजबाबी स्वभावामुळे त्या ट्विटरवर अनेकदा चर्चेतही असतात. त्यांचा हाच अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युजरला उत्तर देऊन स्वराज यांनी त्याची बोलतीच बंद केलीये.

दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष मांगे राम गर्ग यांच्या निधनानंतर सुषमा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन ट्विट केले होते. त्यांच्या याच ट्विटवर एका युजरने स्वराज यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी स्वराज यांनी हे ट्विट केलं  त्यावेळी निधन झाल्याने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनाही ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली जात होती. त्यामुळे इरफान ए. खान नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन, ‘निधनानंतर शीला दीक्षित यांच्याप्रमाणे तुमचीही खूप आठवण येईल अम्मा’ असे लिहिले होते. ‘माझ्याबाबत अशाप्रकारच्या भावना जपल्याबाबत तुमचे आगाऊ धन्यवाद मानते’ असं उत्तर स्वराज यांनी दिलं आणि त्याची बोलतीच बंद केली. स्वराज यांच्या या उत्तरानंतर नेटकऱ्यांनी त्याच ट्विटर युजरला ट्रोल करायला सुरूवात केली आणि त्याला खडेबोल सुनावले. ‘हा व्यक्ती त्याच्या कुटुंबियांबाबतही असाच विचार करत असावा मॅडम तुम्ही सणसणीत उत्तर दिलंय’ अशाप्रकारचे ट्विट नेटकऱ्यांनी केले.


दरम्यान, दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष मांगे राम गर्ग यांचे रविवारी निधन झाले. मांगे राम गर्ग हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील एक्शन बालाजी रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर रविवारी सकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.