ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातून परिवहन विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. इथे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका ट्रक चालकाला चक्क हेल्मेट न घातल्यामुळे दंड ठोठावला आहे. परिवहन विभागाच्या या भोंगळ कारभाराची सध्या चांगलीच चर्चा आहे.


गंजम जिल्ह्यातील प्रमोद कुमार हे परिवहन विभागाच्या कार्यालयात वाहन परमिट नूतनीकरणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तुझी गाडी क्रमांक OR-07W/4593 च्या नावे एक चलान भरायचा राहिला आहे असं सांगण्यात आलं. त्यावर चलान का आकारण्यात आलं अशी विचारणा प्रमोद यांनी केली. तर, हेल्मेट न घालता वाहन चालवल्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आल्याचं कारण अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. पण धक्कादायक बाब ही होती की ट्रक चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आला.

प्रमोद कुमार यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली, पण त्यांनी काही ऐकलं नाही. अखेर पर्याय नसल्यामुळे त्यांनी हेल्मेट न घालता ट्रक चालवल्यामुळे दंड भरला आणि नंतर वाहन परमिट नूतनीकरण केलं. इंडियाटुडेच्या वृ्त्तानुसार, “मी गेल्या तीन वर्षांपासून ट्रक चालवत असून पाणी पुरवठ्यासाठी ट्रक वापरला जातो. अशात माझ्या ट्रकचं परमिट संपल्यामुळे नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेलो. त्यावेळी मला चलान शिल्लक असल्याचं कळालं, पण ट्रकसाठी हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड आकारण्यात आला होता. ते लोकांना विनाकारण त्रास देऊन पैसे गोळा करत आहेत, असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने काहीतरी पावले उचलायला हवीत”, अशी प्रतिक्रिया प्रमोद यांनी दिली आहे.