पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहिर केला. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद होऊन नवी २ हजार आणि ५०० ची नोट चलनात येणार असल्याचे मोदींनी जाहिर केली.  या निर्णयानंतर फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडिया आणि व्हॉट्स अॅपवर संदेशांचा आणि विनोदांचा पाऊस सुरु झाला होता. अशातच नोटांचे बंडल हातात घेऊन असलेल्या एका मुलीचा फोटोही व्हायरल झाला होता. ही मुलगी भाजपच्या एका नेत्याची मुलगी असून सामान्य नागरिकांच्या हाती नोटां येण्याआधी तिच्या हातात नव्या नोटांचे बंडल आले कसे ? असा सवाल अनेकांनी केला. या फोटोंवरून अनेकांनी मोदींच्या निर्णयावर आक्षेप घेतला. मोदींनी हा निर्णय घेण्यापूर्वीच आपल्या नेत्यांना त्याची खबर दिली होती असे आरोप हा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी केला.

नलिनी मौर्य असे या मुलीचे नाव सांगण्यात आले. २००० च्या नोटांचे बंडल घेऊन उभी असलेली ही मुलगी भाजपाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांची मुलगी असल्याचा संदेश फिरत होता. मोठ्या प्रमाणत हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आणि केशव प्रसाद यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी ही आपली मुलगी नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याला दोन मुलं आहेत या अज्ञात मुलीला माझी मुलगी आहे असे सांगून विरोधक माझ्यावर खोटे आरोप करत आहे त्यामुळे आपली प्रतिमा मलिन करणा-यावर कायदेशीर कारवाई करू अशी तंबी त्यांनी दिली. दरम्यान व्हायरल झालेला हा फोटो बँकेमधल्या एका कर्मचा-याचा असल्याचे समजते आहे.