दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला. ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी अनुक्रमे या दोन्ही शहरांवर अणुबॉम्ब टाकून ही शहरं बेचिराख करण्यात आली. या अणुबॉम्ब हल्ल्यानं दुसरं महायुद्ध संपलं पण, कधीही भरून न निघणारी हानी या युद्धानं केली. या अणुबॉम्ब हल्ल्यात हिरोशिमामधले १ लाख ४० हजार तर नागासाकीमधल्या ७० हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. जे जगले त्यांनी मरणप्राय यातना अनुभवल्या. या भयंकर हल्ल्यातून त्सुतोमु यामागुची दोनदा बचावले. २०१० मध्ये कॅन्सरनं वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. हिरोशिमा आणि नागासाकी हल्ल्यातून दोनदा बचावलेले एकमेव व्यक्ती अशी ओळख नुकतीच जपाननं त्यांना दिली.

ज्या दिवशी पहिला अणुबॉम्ब हिरोशीमावर टाकण्यात आला त्यावेळी त्सुतोमु तिथेच होते. आपल्या घरी नागासाकीमध्ये परतण्याची तयारी ते करत होते. अणुबॉम्बमुळे झालेला नरसंहार त्यांनी पाहिला. लाखो लोकांना मरणप्राय यातना भोगून जीव गमवताना त्यांनी पाहिलं. हा हल्ला झाल्यानंतर दोन दिवसांत ते नागासाकीत परतले. ते नागासाकीत परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ ऑगस्टला अमेरिकेनं दुसरा अणुबॉम्ब टाकला. यात ७० हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. मात्र नशीबानं त्सुतोमु दोनदा बचावले. १६ मार्च १९१६ ला त्यांचा जन्म झाला तर ४ जानेवारी २०१० मध्ये त्यांचं निधन झालं.

या हल्ल्यातून ते वाचले असले तरी कित्येक वर्ष ते कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढा देत होते. या हल्ल्यातून जे वाचले त्यांचा मरणप्राय यातना भोगत करूण अंत झाला. पण त्सुतोमु असे एकमेव होते जे हिरोशिमा आणि नागासाकी येथील दोन्ही हल्ल्यातून सुखरूप बचावले. नुकताच जपान सरकारनं या वृत्ताला अधिकृत दुजोरा देत त्सुतोमु यांचा गौरव केला आहे असं ‘दी गार्डीअन’ वर्तमान पत्रानं म्हटलं आहे.

ज्या वेळी हे दोन्ही हल्ले झाले त्यावेळी हल्ल्याच्या टप्प्यातील जागेपासून ते तीन किलोमीटर दूर अंतरावर होते. त्यामुळे अणुबॉम्ब हल्ल्याचा प्रभाव तितकासा त्यांच्यावर झाला नाही. या हल्ल्यातून वाचलेल्या त्यांच्या मुलाचं वयाच्या ५९ वर्षी निधन झालं.