12 November 2019

News Flash

ध्यानावरुन ट्विंकल खन्नाने घेतली पंतप्रधान मोदींची फिरकी

आता अभिनेत्री ट्विंकल खन्नाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणेतील फोटोवरुन फिरकी घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ जवळच्या गुहेमधील ध्यानधारणेचा एक फोटो समोर आला होता. सोशल मीडियावर या फोटोची बरीच चर्चा झाली. आता अभिनेत्री ट्विंकल खन्नाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणेतील फोटोवरुन फिरकी घेतली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या ट्विंकलने तिचा ध्यानाच्या मुद्रेतील एक फोटो टिे्वट केला आहे.

मित्रांनो प्लीज साईन करा. मागच्या काही दिवसात बरेच अध्यात्मिक फोटो पाहिल्यानंतर आता मी ध्यान, फोटोग्राफी, पोझ आणि अँगल ही कार्यशाळा सुरु करत आहे. लग्नाच्या फोटोग्राफीनंतर ही दुसरी मोठी गोष्ट ठरेल असे मला वाटते असे ट्विंकलने फोटोखाली संदेशात म्हटले आहे.

काही युझर्सनी अशा प्रकारची मस्करी करणे योग्य नाही असे ट्विंकलला सुनावले आहे. काही युजर्सनी थेट ट्विंकलचा पती अक्षय कुमारला टॅग केले आहे. अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा प्रशंसक समजला जातो. अक्षयने पंतप्रधान मोदींच्या अनेक सामाजिक योजनांचा आपल्या चित्रपटांद्वारे प्रसार केला आहे. अलीकडेच अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली मुलाखत बरीच गाजली होती. अक्षय कुमारने यावेळी मोदींना त्यांच्या खासगी जीवनातील अनेक गोष्टींबद्दल बोलते केले होते. आता अक्षयच्या पत्नीनेच मोदींना थेट लक्ष्य केले आहे.

First Published on May 20, 2019 6:39 pm

Web Title: twinkle khanna dig at pm modi by sharing her meditation picture