ट्विटरने चक्क त्यांच्या सीईओंचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याचा प्रकार मंगळवारी घडला, त्यामुळे आता सोशल मीडियावर याची चर्चा होत आहे.

ट्विटवरचे सीईओ जॅक डॉर्सी यांचे अकाऊंट ट्विटरकडून गोठवण्यात आले त्यामुळे काही काळ जॅकसुद्धा संभ्रमात पडले. मंगळवारी रात्री ट्विटरकडून हा प्रकार घडला. अकाऊंट पूर्ववत झाल्यानंतर जॅक यांनी काही आंतरिक चुकांमुळे हा प्रकार घडल्याचे ट्विट केले. ट्विटरकडून अनावधाने माझे अकाऊंट गोठवण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री उशीरा त्यांची प्रोफाईल लोड होण्यास अडचण येत होती. जर एखाद्याचे अकाऊंट हॅक केले असेल किंवा त्याच युजर्सबद्दल इतर फॉलोअर्सकडून मोठ्या प्रमाणात ट्विटरकडे तक्रारी जात असतील तर ट्विटरकडून ते अकाऊंट निलंबित करण्यात येते.

वाचा : ट्विटरच्या विक्रीची टिवटिव…

परंतु नंतर मात्र ही ट्विटरच्या कर्मचा-याकडून अनावधानाने झालेली चूक असल्याचे जॅक यांनी मान्य केले. त्यानंतर काही काळाने ट्विटरने पून्हा त्यांचे अकाऊंट पूर्ववत केले. अकाऊंट पूर्ववत झाल्यावरही काही अडचणी येत होत्या. जॅक यांनी २००६ मध्ये ट्विटरवर आपले अकाऊंट उघडले होते. या काळात त्यांनी केलेले काही ट्विट्स गायब आहेत. जॅक यांना ट्विटरवर फॉलो करणा-यांची संख्या अधिक आहे. त्यांचे ट्विटरवर जवळपास २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अकाउंट पूर्ववत झाल्यावर या फॉलोअर्सची संख्या १५० हूनही कमी दाखवत होती पण नंतर मात्र कंपनीकडून या अडचणी दूर करण्यात आल्या. पण जॅक यांच्या ट्विट्नंतर मात्र अनेकांनी ट्विटरवर टीका करायला सुरूवात केली. जर ट्विटर अनावधानाने आपल्या सीईओंचे अकाऊंट निलंबित करू शकतो तर जगात कित्येक युजर्सचे अकाऊंट अनावधानाने निलंबित होत असतील अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.