करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत कार्यालयं सुरू ठेवण्याची परवानगी नसल्यानं अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा दिली आहे. पण काही कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा अधिक रूचत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच सोशल नेटवर्कींग साईट ट्विटरनं आपल्या कर्मचाऱ्यांना कायम अर्थात कर्मचाऱ्यांना हवं आहे तोवर घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

करोना व्हायरसचं संकट संपल्यानंतरही अनेक कर्मचारी घरूनचं काम करतील. ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याची इच्छा असेल त्यांनाही मनाई केली जाणार नाही, असं डोर्सी यांनी सांगितल्याची माहिती ट्विटरच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. बजफीड न्यूझनं दिलेल्या वृत्तानुसार सप्टेंबरपूर्वी आम्ही कर्मचाऱ्यांसाठी ऑफिस सुरू करू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. तसंच डिसेंबरपर्यंत सर्व प्रकारची इव्हेंट रद्द करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त २०२१ मध्ये पार पडणाऱ्या इव्हेंट्सबद्दल या वर्षाच्या अखेरिस निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वर्क फ्रॉम होम करू शकणार

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑफिसमध्ये अनेक कर्मचारी एकत्र येऊ नयेत यासाठी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा प्रदान केली. गेल्या काही महिन्यांमध्ये घरूनही उत्तम काम करत त्यांनी आपण चांगलं काम करू शकतो हे सिद्ध केल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

कायमही वर्क फ्रॉम होम

जर कर्मचारी घरून काम करत असतील आणि त्यांना कोणत्याही समस्यांनाचा सामना करावा लागत नसेल, तसंच त्यांच्या प्रॉडक्टिव्हिटीवर कोणताही परिणाम जाणवत नसेल तर त्यांना कायमही घरून काम करण्याची परवानगी असेल. जर सुरक्षिततेचे नियम पाळून काही जणांना ऑफिसमध्ये येऊन काम करायचं असेल तरी त्यांचं स्वागत केलं जाईल, असंही ट्विटरनं स्पष्ट केलं आहे.