हॉलिवूड सुपरस्टार चॅडविक बोसमन यांचं शुक्रवारी(दि.२९) निधन झालं. ते ४३ वर्षांचे होते. बोसमन गेल्या चार वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत होते. अखेर याच कर्करोगामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. बोसमन हे मार्वल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर’मधून विशेष लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातील त्यांचे चाहते श्रद्धांजली देत आहेत.

माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरनुसार, बोसमन यांच्या ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आलेलं अखेरचं ट्विट आतापर्यंतचं ट्विटरवरील सर्वाधिक लाइक मिळालेलं ट्विट ठरलं आहे. बोसमन यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक स्टेटमेंट जारी करण्यासाठी हे ट्विट केलं होतं. या ट्विटला अवघ्या तासाभरातच एक दशलक्षपेक्षा जास्त लाइक मिळाले, तर २४ तासांपेक्षा कमी वेळेत हे ट्विटच्या इतिहासातील सर्वाधिक लाइक मिळालेलं ट्विट ठरलं आहे.

या ट्विटमध्ये चॅडविक बोसमन यांचा हसतानाचा एक फोटो आणि त्यासोबत एक संदेश आहे. त्यात चॅडविक बोसमन यांच्या निधनाची माहिती देण्यात आली असून त्यांना २०१६ मध्येच स्टेज ३ कोलोन कँन्सरने ग्रासलं होतं. गेल्या चार वर्षांपासून ते कर्करोगाशी लढाई देत होते पण कॅन्सर स्टेज-4 पर्यंत आला होता, असं नमूद केलं आहे. यामध्ये किमोथेरेपी आणि सर्जरी झाल्यानंतर लगेचच चॅडविक यांनी कशाप्रकारे अनेक सिनेमांसाठी शूटींग केलं, याबाबत सांगण्यात आलं आहे. “ते खरंच एक लढवय्या होते. चॅडविक यांनी संघर्षाच्या काळातही प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी केला. या चित्रपटांवर प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम केलं. गेल्या चार वर्षांमध्ये बोसमन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे या काळात त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु होती”, असं बोसमन यांच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. ट्विटच्या अखेरीस चॅडविक यांच्या कुटुंबीयांनी लोकांचे प्रेम आणि प्रार्थनेसाठी आभार मानले आहेत.

दरम्यान, बोसमन यांनी ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटात सम्राट टी चाला ही भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली. तसंच त्यांनी ‘42’,‘Get on Up’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.