एखाद्या मोठ्या कंपनीच्या उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा पगार किती गलेलोठ्ठ आहे हे वेगळं सांगायला नको, गडगंज पगार, अनेक सोयी सुविधा त्यांना दिल्या जातात. पण, ट्विटरचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक जॅक डोर्सी मात्र सगळ्यांहूनही वेगळे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी कंपनीकडून कोणत्याही सुविधा घेतल्या नाहीत. तर २०१७ मध्ये त्यांनी विनापगार कंपनीचं काम पहिल्याचं समोर आलं आहे.

ट्विटरनं यूएस सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या माहितीनुसार जॅक यांनी २०१७ मध्ये कंपनीकडून एकही रुपया स्विकारला नाही. त्याचप्रमाणे कंपनीकडून त्यांना दिल्या जाणाऱ्या इतर सुविधाही त्यांनी नाकारल्या आहेत. जॅक डोर्सी २०१५ पासून ट्विटरचे सीईओ आहेत. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटमध्ये डोर्सी गेल्या काही महिन्यांपासून महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे. डोर्सी यांना अपेक्षित असा अॅक्टिव्ह युजर्स अजूनही ट्विटरवर नाही त्यामुळे ही साईट अधिक युजर्स फ्रेंडली होण्यासाठी जॅक डोर्सींचा प्रयत्न सुरू आहे. डोर्सी यांचे कंपनीत समभाग आहेत ज्याची सध्याच्या घडीला किंमत कंपनीच्या एकूण समभागापैकी २०% आहे.