जगभरामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत. मात्र तुम्ही क्वचितच निळ्या रंगाच्या सापाबद्दल ऐकलं असेल किंवा तो पहिला अशेल. मात्र सोशल मीडियावर सध्या निळ्या रंगाच्या दुर्मिळ सापाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा साप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अगदी छोट्या आकाराचा हा साप एखाद्या कार्टून किंवा चित्रामधील साप वाटावा त्याप्रमाणे अगदी गडद निळ्या रंगाचा आहे. सोशल मिडियावर या सापाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी हा जगातील सर्वात सुंदर साप असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधील हा निळा साप लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलावर बसला आहे. त्यामुळेच अधिकच स्पष्ट आणि सुंदर दिसत आहे.

निळ्या रंगाचा हा साप लाल रंगाच्या गुलाबावर बसलेला दिसत आहे. हा ब्लू पिट वायपर प्रजातीचा साप आहे. हा साप दिसायला सुंदर असला तरी तो अत्यंत विषारी सापांपैकी एक आहे. हा साप चावल्यास वेगाने त्याचे विष शरीरामध्ये पसरते आणि अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. हा साप चावल्यास व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. मॉस्को प्राणीसंग्रहालयाने दिलेल्या माहितीनुसार हा साप पांढऱ्या रंगाच्या आईलॅण्ड पिट व्हायपर सापाची उपप्रजाती आहे. हे साप इंजोनेशिया आणि पूर्व तिमोरामध्ये आढळून येतात. पांढऱ्या रंगासाठी ओळखल्या जाणाऱ्या या सापाच्या प्रजातीमधील काही साप हिरव्या रंगाचेही आढळून येतात. मात्र निळ्या रंगाचा पिट व्हायपर अगदीच दुर्मिळ आहे. मास्को प्राणीसंग्रहालयाचे जनरल डायरेक्टर स्वतलान अकुलोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या प्रजातीच्या निळ्या रंगांच्या सापाचे जोडपे हिरव्या रंगाच्या सापांना जन्म देऊ शकते.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ लाइफ ऑन अर्थ नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. “अविश्वसनीय वाटावा असा हा ब्लू पिट वायपर साप,” अशी कॅप्शन देत व्हिडिओ १७ सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे. एक लाख ३४ हजारहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तर चार हजारहून अधिक जणांनी तो रिट्विट करुन शेअर केला आहे. नऊ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

अनेकांनी या सापाच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे. मात्र काहीजणांनी या व्हिडिओमध्ये गुलाब पकडलेल्या व्यक्तीला साप विषारी आहे याची कल्पना नसावी असंही म्हटलं आहे.