सध्याच्या घडीला सोशल मीडियावर बहुतांश लोकं सक्रिय असतात. एकट्या भारतातून जवळपास 1.75 कोटी लोकं ट्विटरचा वापर करतात. तर, फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटींपेक्षा जास्त झालीये. सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. अशात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने महिलांबाबतचा एक सर्वे जारी केला आहे.

सोशल मीडियावर महिला सर्वाधिक कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतात, त्यांनी केलेले ट्विट्स या बाबींवर सर्वेमधून प्रकाश टाकण्यात आला. ट्विटरच्या या सर्वेमध्ये 700 महिला सहभागी झाल्या होत्या, त्यांच्या 5,22,992 ट्विट्सचं परिक्षण करण्यात आलं. या सर्वेमध्ये जानेवारी 2019 पासून फेब्रुवारी २०२० पर्यंत केलेल्या ट्विट्सचा समावेश आहे.

ट्विटर इंडियाच्या सर्वेनुसार, भारतातील बहुतांश महिला आपल्या ‘पॅशन’बाबत (Passion ) सर्वाधिक चर्चा करतात. सर्वे रिपोर्टनुसार, 24.9 टक्के महिला पॅशन (फॅशन, बुक्स, ब्युटी, एंटरटेन्मेंट आणि फूड) याबाबत गप्पा मारतात. तर, ‘करंट अफेअर’बाबत 20.8 टक्के, ‘सेलिब्रिटी मोमेंट’बाबत 14.5 टक्के, समाजाबाबत 11.7 टक्के आणि सामाजिक बदलाबाबत 8.7 टक्के महिला ट्विट करतात. पण, यातील ‘सेलिब्रिटी मोमेंट’विषयावर सर्वाधिक एंगेजमेंट असते. या विषयावरील ट्विट्सना सर्वाधिक रिप्लाय आणि लाइक्स महिलांकडून भेटतात.

सेलिब्रिटी मोमेंटमध्ये चेन्नई टॉप :
सर्वेनुसार, सेलिब्रिटी संबंधित ट्विटच्या बाबतीत चेन्नई सर्वात पुढे आहे. याशिवाय समाज, सामाजिक बदल या विषयाबाबत बंगळुरूमधून सर्वात जास्त ट्विट होतात. तर, गुवाहाटीमधून ‘पॅशन’ आणि ‘करंट अफेअर’बाबत सर्वाधिक ट्विट्स केले जातात. महिलांना सर्वाधिक कोणत्या क्षेत्राबाबत आवड आहे हे देखील या सर्वेमधून समोर आलं आहे. यानुसार 20.8 टक्के महिला ट्विटरवर देश-दुनियाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी लॉग-इन करतात. या बाबतीत गुवाहाटी आणि दिल्ली दोन शहरं टॉपवर आहेत. या श्रेणीमध्ये #StudentExams, #COVID19 आणि #DelhiElections2020 असे हॅशटॅग अव्वल ठरलेत. शिवाय या सर्वेमधून एक वेगळी बाब समोर आली आहे, ती म्हणजे केवळ 11.7 टक्के महिलांनाच एकमेकांशी कनेक्ट होण्याची इच्छा असते.