नोटाबंदीच्या निर्णय जाहिर केल्यानंतर दरदिवशी वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळत आहे. अशातच सरकारच्या या गोंधळावर टीका करण्याची एकही संधी सोशल मीडियावर नेटीझन्सने सोडली नाही. त्यामुळे, ट्विटरवर मोदी यांच्या समर्थनार्थ किंवा विरोधात अनेक हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये येत आहेत. अशातच सकाळपासूनच भारतात ट्विटरवर ‘मोदी_फिरकी_ले_रहा_है’ हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आहे. सोमवारीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँक खात्यात जमा होणाऱ्या बेहिशेबी रकमेवर ५० टक्के कर लावण्याचा प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला आहे. मात्र बेहिशेबी रक्कम आयकर विभागाने पकडल्यास त्यावर तब्बल ८५ टक्के कर लावावा असे या प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे प्रस्तावावर ट्विटवर अनेक प्रतिक्रिया दिसत आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्राप्तिकर सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. या सुधारित विधेयकानुसार ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जमा झालेल्या बेहिशेबी रकमेवर कर लावण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये बेहिशेबी रकमेवर ३० टक्के कर, १० टक्के दंड आणि ३३ टक्के सरचार्ज आकारला जाईल. हा सरचार्ज एकूण कराच्या १३ टक्के असणार आहे. या सरचार्जला ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण सेस’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र जो व्यक्ती बेहिशेबी रक्कम स्वतःहून जाहीर करणार नाही आणि आयकर विभागाने त्याला पकडले तर अशा काळा पैसाधारकांची कोंडी होणार आहे. अशा व्यक्तींना ७५ टक्के कर आणि १० टक्के दंड भरावा लागेल. प्रस्तावानुसार बेहिशेबी संपत्ती जाहीर करणाऱ्याचे नाव उघड केले जाणार नाही. याशिवाय काळा पैसा धारकांना जाहीर केलेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम ही गरीब कल्याण योजनेच्या निधीत जमा करावी लागेल. या पैशांचा वापर शिक्षण, आरोग्य, सिंचन, पायाभूत सुविधा, शौचालय अशा विविध कामांसाठी केला जाणार आहे. चार वर्षांसाठी हे पैसे या योजनेसाठी वापरले जातील.

त्यामुळे काळा पैसे लवपण्यासाठी पळवाट शोधणा-यांच्या मोदींनी मुसक्या आवळल्या आहेत. अशातच मोदींनी भाजपाच्या सर्व खासदार आणि आमदारांना त्यांच्या बँक खात्याचा तपशील जाहिर करण्याचे आदेश दिले आहे. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतच्या बँक खात्याचे तपशील हे खासदार आणि आमदारांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे जमा करावे असे आदेश मोदींनी दिले आहे. त्यामुळे एकूण दोन दिवस सुरू असलेल्या या एका मागून एक महत्त्वाच्या घोषणेमुळे मोदी विरोधात आणि मोदी समर्थनार्थ हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत.