मैत्रिणीने कोणत्याही परिस्थितीत आपल्या प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी एका तरुणाने थेप पुणे पोलीस आयुक्तांनाच गळ घातली होती. झालं असं होतं की, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. #LetsTalkCPPuneCity मोहिमेअंतर्गत अमिताभ गुप्ता यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. नागरिक आपल्या समस्या मांडत असताना एका तरुणाने थेट आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्याचा उल्लेख करत मदत मागितली.

विशेष म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या पुणे पोलीस आयुक्तांनी हा प्रश्नही टाळला नाही. त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना नाही म्हणजे नाही सांगत मुलीच्या इच्छेविरोधात काहीच होऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं.

उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, “दुर्दैवाने तिच्या इच्छेविरोधात आम्हीदेखील काही मदत करु शकत नाही. तिच्या इच्छेविरोधात तूदेखील काही करु नये. जर एखाद्या दिवशी तिने तयारी दर्शवली तर तुला आमच्याकडून शुभेच्छा आहेत”. अमिताभ गुप्ता यांनी यावेळी #ANoMeansNo हा हॅशटॅग वापरला आहे.

अमिताभ गुप्ता यांनी यावेळी महिलांची सुरक्षा, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर, पोलिसांकडून सर्वसामान्यांसोबतचं वर्तन अशा अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.