गेल्या तीन सामन्यांमध्ये एकही गोल करण्यात अपयशी ठरलेला रिअल माद्रिदचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रविवारी डेपोर्टिव्हो ला कोरुनाविरुद्ध झालेल्या सामन्यात दोन गोल झळकावले. या सामन्यात रिअल माद्रिदने डेपोर्टिव्हो ला कोरुनाचा ७-१ अशा फरकाने पराभव केला. ला लिगामध्ये रिअल माद्रिदच्या संघाला त्यांच्या होमपीचवर सूर सापडत नव्हता. त्यामुळे डेपोर्टिव्हो ला कोरुनाविरुद्धचा विजय संघासाठी दिलासादायक ठरला. मात्र, रिअल माद्रिदच्या चाहत्यांमध्ये या विजयापेक्षा ख्रिस्तियानो रोनाल्डोची सामन्यादरम्यानची एक कृती चर्चेचा विषय ठरत आहे.

रोनाल्डोने या सामन्यात दोन गोल झळकावल्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. सामना संपायला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना रोनाल्डो गोल करायचा प्रयत्न करत होता. यावेळी डेपोर्टिव्हो ला कोरुनाचा बचावपटू फॅबिअन स्केहर याचा बूट रोनाल्डोच्या तोंडावर लागला. त्यामुळे रोनाल्डोच्या डोळ्याच्या बाजूला जखम झाली. या जखमेतून बरेच रक्त वाहत असल्याने रोनाल्डोच्या चेहऱ्याचा एक भाग रक्ताने माखला होता. रोनाल्डोची ही दुखापत पाहून रिअल माद्रिदचे फिजिओ मैदानात आले. ते रोनाल्डोला घेऊन मैदानाबाहेर जात होते. यावेळी रोनाल्डोने आपली जखम पाहण्यासाठी त्यांचा मोबाईल मागून घेतला. रोनाल्डोने मोबाईलचा आरशासारखा वापर करत आपली जखम पाहिली. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून रोनाल्डोवर दिखाऊपणा केल्याची टीका होता आहे. ‘रोनाल्डोची ही गोष्ट तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल’, ‘रोनाल्डोचा मेकअपमन ही जखम लपवू शकत नाही’, ‘रोनाल्डोचा ‘सेल्फी गेम’ पाहून फिजिओ अवाक झाले’, अशा धाटणीच्या अनेक प्रतिक्रिया ट्विटरवर पाहायला मिळाल्या.

रिअल माद्रिदने गेल्या २२ महिन्यांत १० पैकी आठ जेतेपदांवर नाव कोरण्यात यश मिळवले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत कदाचित सर्वोत्तम खेळ या २२ महिन्यांत केला असावा. त्यामुळेच माद्रिद आणि प्रशिक्षक झिनेदिन झिदान हे यशोशिखरावर आरूढ झाले. पण हाच रोनाल्डो सध्या सातत्यपूर्ण कामगिरीशी झगडत आहे आणि त्याचा परिणाम क्लबच्या व अन्य खेळाडूंच्या कामगिरीवर होताना जाणवत आहे. पण याचा सर्वाधिक फटका झिदान यांना बसत आहे. त्यांच्या मार्गदर्शन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.