बंगरुळुमधल्या महिला विनयभंगाचे प्रकरण अजूनही कोणी विसरले नाही. ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येथे जमले होते आणि याच रात्री महिला विनयभंगाच्या अनेक घटना घडल्या. जवळपास १ हजार पोलीस येथे तैनात होते पण सगळेच हातावर हात धरून गप्प बसले होते असे आरोपही यावेळी झाले. ते बंगळुरूचे पोलीस असो किंवा दिल्ली पोलीस असो महिलांना अडचणीच्या वेळी त्यांच्याकडून मदत मिळत नाही असे आरोप अनेकदा ऐकायला मिळतात. पण रात्री दीडच्या सुमारास अडचणीत सापडलेल्या मुलीला मदत करून सुरक्षित घरी पोहोचवल्या बद्दल दिल्लीतील दोन पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

वाचा : फॅशन डिझायनिंगमधले करिअर सोडून ‘ती’ दाखल झाली पोलीस दलात

आपल्या समजातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते पण अनेकदा याच बाबतीत दिल्ली पोलिसांना टिकेचे लक्ष केले गेले. पण या सा-या समजूती एएसआय अधिकारी ओम प्रकाश आणि दया किशन यांनी खोडून काढल्या आहेत. रात्रीच्या वेळी गस्त घालताना प्रियांका कंबोज नावाची तरुणी त्यांना रस्त्यावर दिसली. तिच्या गाडीतील चाकाची हवा गेली होती. रात्रीचा दीड वाजला होता. तिने मेकॅनिकला फोनही केले पण मदत करण्याऐवजी त्यांनी दुप्पट तिप्पट पैसे सांगितले. प्रियांका तितकेही पैसे द्यायला तयार झाली. पण याच वेळी ओम प्रकाश आणि दया किसन यांनी तिला हटकले. रात्री दीडची वेळी होती प्रियांका रस्त्यात एकटीच होती. या दोघांनीही तिच्या गाडीचे पंक्चर काढले आणि तिला मदत केली. इतकेच नाही तर प्रियांकाला सुरक्षित घरी देखील सोडले. प्रियांकाने हा संपूर्ण प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे.