प्रवासादरम्यान आपल्या समोर अनेकदा अनपेक्षित घटना घडत असतात. अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हैदराबाद मेट्रोमध्ये एका सापाने चक्क 2 हजार 500 किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. या सापाला सोमवारी मेट्रोमधून सर्पमित्रांनी बाहेर काढलं. तब्बल पाच दिवस या सापाने मेट्रोमधून प्रवास केला.

दरम्यान, हा साप बिनविषारी असल्याची माहिती सर्पमित्रांकडून देण्यात आली. या दोन फुटी सापाने मेट्रो रेल प्राधिकरण आणि सर्पमित्रांच्या नाकी नऊ आणले होते. परंतु पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या सापाला मेट्रो चालकाच्या केबिनमधून पकडण्यात आले. मेट्रोमध्ये हा साप पहिल्यांदा 14 ऑगस्ट रोजी दिसला होता. त्यानंतर काही प्रवाशांनी सर्पमित्रांना फोन करून याची माहिती दिली होती. त्यानंतर त्या सापाचा शोध घेण्यात आला. परंतु तो सापडला नव्हता.

त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा दिलखुशनगर मेट्रो स्थानकावरील काही अधिकाऱ्यांना मेट्रोमध्ये साप असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी संपूर्ण मेट्रो रिकामी करण्यात आली आणि मेट्रो एलबी नगर यार्डात नेण्यात आली. दरम्यान, सोमवारी दुपारी 2 वाजता डायव्हर केबिनमध्ये साप असल्याची माहिती देण्यासाठी आम्हाला फोन आला होता, असे फ्रेंड्स ऑफ स्नेक सोसायटीच्या एम.एस. जयशंकर यांनी बोलताना सांगितले. तसेच सापाला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, या सापाने मेट्रोतून जवळपास 80 फेऱ्या म्हणजेच तब्बल 2 हजार 500 किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली.