पेंग्विनचं जोडपं आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहतात. नर आणि मादी आळीपाळीनं अंडी उबवणं आणि पिल्लांची काळजी घेण्याचं काम करतात. पण सध्या सिडनीच्या मत्सालयातील एक गे पेंग्विनची जोडी चर्चेत आली आहे. ही जोडी चक्क अंडं उबवत आहे. आतापर्यंत कधी न ऐकलेला प्रकार सिडनीच्या मत्सालयात घडला आहे. म्हणूनच ही जोडी सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे.

स्पेन आणि मॅजिक या दोन नरांनी एकमेकांना मागणी घातली आणि ते दोघंही जोड्यानं राहू लागले. अनेकदा पेंग्विन पक्षी आपल्या जोडीदाराला मागणी घालताना त्याच्यापुढे लहानसे खडे किंवा गुळगुळीत गोटे ठेवतात. हे खडे मादीनं चोचीत उचलले की पुढे नर- मादीची जोडी तयार होते. स्पेन आणि मॅजिक हे दोघंही अशाच पद्धतीनं एकत्र आले. त्यानंतर विणीचा हंगाम सुरू झाल्यावर इतर पेंग्विनच्या जोडीप्रमाणे दोघांनीही घरटं तयार करायला सुरूवात केली.

गे पेंग्विनच्या जोडप्यानं तयार केललं घरटं हे अन्य जोडप्यांच्या घरट्यापेक्षा खूपच मोठं होतं त्यामुळे मत्सालयातील अनेक कर्मचाऱ्यांना या दोघांबद्दल कुतूहल वाटू लागलं. त्यानंतर दोघांनाही मत्सालयातील कर्मचाऱ्यांनी खोटं अंड उबवण्यासाठी दिलं. विशेष म्हणजे स्पेन आणि मॅजिक या दोघांनीही या अंड्याची मायेनं काळजी घेतली. त्यानंतर या दोघांनाही खरं अंडं उबवण्यासाठी देण्यात आलं. सध्या स्पेन आणि मॅजिक हे आळीपाळीनं अंड उबवण्याचं आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम करत आहेत.