तेलंगणमधील हुजूराबाद शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. पोलिसांनी कोणत्याही गुन्हेगाराला नाही तर चक्क दोन बकऱ्यांना अटक केल्याचा प्रकार घडला. एका सामाजिक संस्थेद्वारे लावण्यात आलेल्या झाडांमधील काही झाडांवरचा पाला या बकऱ्यांनी खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ‘तेलंगानाकु हरिता हरम’ अंतर्गत ही झाडं लावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

हुजूराबाद नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बकऱ्यांच्या मालकाला 1 हजार रूपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर त्याच्या दोन बकऱ्यांना सोडण्यात आलं. सेव्ह द ट्रिज संस्थेचे अनिल आणि विक्रांत नावाचे दोन कार्यकर्ते आपच्याकडे आले होते. त्यांच्याद्वारे लावण्यात आलेली झाडांवरील पाला या दोन्ही बकऱ्यांनी खाल्ल्याची तक्रार त्यांनी दिल्याची माहिती हुजूराबाद नगरपालिकेच्या अधिकारी माधवी यांनी दिली.  ‘द हिंदू’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. आपल्या संघटनेने तब्बल 900 झाडं लावली होती. त्यापैकी 250 झाडं त्या बकऱ्यांनी खाऊन टाकली. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. मंगळवारी त्या बकऱ्या पुन्हा झाडांवरील पाला खाण्यासाठी आल्या तेव्हा त्यांना पकडण्यात आल्याची माहिती दोघांनी पोलिसांना दिली.

त्यानंतर बकऱ्यांच्या मालकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. तसंच दंड ठोठावल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या बकऱ्या सोडून दिल्या. तसंच बकऱ्यांना शहराच्या बाहेर किंना घरातच चारा खायला देण्याचे आदेशही पोलिसांनी दिले. दरम्यान, त्या बकऱ्या आमच्यासाठी डोकेदुखी ठरलेल्या. आम्ही शहरातील शाळा, रूग्णालय आणि पोलीस स्थानकांजवळ स्वत:च्या पैशाने झाडं लावली होती. परंतु झाडं लावल्यानंतर काही दिवसातच बकऱ्यांनी ती खाऊन टाकली, असं तक्रारदारांनी सांगितलं.