‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’, या म्हणीचा प्रत्यय आणणारी एक घटना व्हिएतनाममध्ये घडली आहे. व्हिएतनाममध्ये १२ व्या मजल्यावरील बाल्कनीतून अवघ्या दोन वर्षांची एक चिमुकली पडली, पण सुदैवाने रस्त्यावर असलेल्या एका डिलिव्हरी ड्रायव्हरने तिला अलगद झेललं आणि तिचा जीव वाचला. रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून चिमुकलीला अलगद झेलणाऱ्या डिलिव्हरी ड्रायव्हरवर कौतुकाचा वर्षाव होत असून स्थानिक माध्यमांमध्ये तर तो हिरो ठरलाय. या रिअल लाइफ हिरोचं नाव न्ग्येन नागॉस मैनह असून 31 वर्षीय न्ग्येनने Anninhthudo या स्थानिक वृत्तसंस्थेला सांगितलं की, तो एका ग्राहकाला ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी हनोईला गेला होता. रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कारमध्ये बसून ग्राहकाची प्रतीक्षा करत असतानाच समोरच्या इमारतीतून एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला. खिडकीतून डोकं बाहेर काढून वरती बघितल्यावर एक चिमुकली १२ व्या मजल्यावरील बाल्कनीत लटकली असल्याचं त्याला दिसलं. ते भयानक दृष्य बघताच तो कारमधून बाहेर निघाला आणि धावत इमारतीखाली पोहोचला व खाली पडणाऱ्या चिमुकलीला अलगद झेललं.

चिमुकलीचा जीव वाचल्यामुळे न्ग्येन चांगलाच खूश असून, काही क्षणात सर्व घटनाक्रम झाला पण अखेरपर्यंत मुलीवरुन नजर हटवली नाही आणि शेवटी सर्व चांगलं झालं असं त्याने म्हटलं. दरम्यान, चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय.


या घटनेनंतर ड्रायव्हर न्गुयेन नागॉस सोशल मीडियात हिरो ठरला असून स्थानिक वृत्तपत्रांमधूनही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.