शिव्या देणे हा गुन्हा असला तरीही भारतात सर्रास एकमेकांना शिव्या दिल्या जातात. मात्र अशाप्रकारे एखादी शिवी देण्यामुळे थेट तुरुंगवास घडू शकतो याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. पण संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे एका व्यक्तीने आपल्या होणाऱ्या बायकोला मूर्ख म्हटल्याने त्याला २ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि ३ लाख ९० हजारांहून अधिक दंड भरावा लागला. आपल्या होणाऱ्या बायकोला हा व्यक्ती व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे मूर्ख म्हटला होता. आपण हा शब्द अतिशय गमतीत वापरला होता असे हा व्यक्ती म्हटला. मात्र या मुलीने ही गोष्ट गांभिर्याने घेत आपल्या होणाऱ्या नवऱ्याची पोलिसात तक्रार केली. याठिकाणी अशाप्रकारे कोणाला शिवी देणे हा दंडनीय अपराध असल्याने या व्यक्तीला लगेचच शिक्षा झाली.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये अशाप्रकारे गमतीत म्हटलेल्या गोष्टी गांभिर्याने घेतल्याने दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाशी बोलताना आक्षेपार्ह विधान करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे या व्यक्तीला जवळपास ४ लाखा रुपयांचा दंड आणि २ महिन्याचा कारावास भोगावा लागला. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये दुबईत राहणाऱ्या एका ब्रिटीश व्यक्तीने आपल्या कार डिलरला काहीतरी चिडका मेसेज पाठवल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे अशाप्रकारे एखादी साधी शिवी दिल्याने शिक्षा इतकी शिक्षा होणे ही भारतीयांसाठी नक्कीच आश्चर्याची बाब ठरु शकते.