घरातील कामात मदत करणारा, आपल्याशी गप्पागोष्टी करुन खरेदीसाठीही सोबत देणारा रोबोट आपल्या सगळ्यांना माहित असेल. पण आता तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीमुळे रोबोट आणखी काही ठिकाणी एखादे महत्त्वाचे काम करताना दिसला तर आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. याचेच प्रत्यंतर नुकतेच आले असून संसदेत एका मंत्र्यांचा अहवाल एका रोबोटने सादर केला. आता ही घटना कोणत्या संसदेत घडली असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. तर ब्रिटनमधील संसदेत पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला असून त्यावरुन मंत्र्यांबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. या रोबोटचे नाव पेपर असून लोकांनी त्याचे नाव बदलून मेबोट असे ठेवले आहे.

संसदेतील एज्युकेशन सिलेक्ट कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार रॉबर्ट हफॉन यांनी पेपर नावाच्या या रोबोटला बोलावले. त्यानंतर पेपरने संसदेत आपला अहवाल सादर केला. एज्युकेशन सिलेक्ट कमिटीच्या समोर या रोबोटने आर्टीफीशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत सांगितले. तसेच शाळांमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत याबाबतही सांगितले. हा रोबोट मिडलसेक्स विद्यापीठाचा असून त्याच्याद्वारे आधीही प्रेझेंटेशन घेण्यात आले होते. त्यानंतर आता त्याने प्रत्यक्ष अहवाल सादर केला. या गोष्टीवरुन लोक पंतप्रधानांना ट्विटरवर बरेच ट्रोल करत आहेत. मात्र त्याचवेळी या रोबोटची मोठ्या प्रमाणात तारीफही केली जात आहे. या रोबोटचे संसदेतील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून जगभरात या रोबोटची चर्चा पाहायला मिळत आहे.