प्रत्येक आईचे आपल्या मुलाला योग्य शिक्षण आणि अन्न देण्याचा प्रयत्न असतो. कधी हे प्रयत्न यशस्वी होतात तर काहींच्या पोटी निराशा येते. असाच एक प्रयत्न तामिळनाडूमधील सेलम येथे राहणाऱ्या आईने केला. तिने आपल्या मुलांची भूक भागवण्यासाठी चक्क स्वत:चे केस १५० रुपयांना विकले.

या महिलेचे नाव प्रेमा आहे. तिला तीन मुले आहेत. प्रेमाच्या पतीने कर्जबाजारीपणाला कंटाळून ७ महिन्यापूर्वी आत्महत्या केली. नवऱ्याच्या आत्महत्येनंतर तिन्ही मुलांची जबाबदारी प्रेमावर पडली. त्यानंतर उदर्निवाह करण्यासाठी ती वीटभट्टीवर काम करु लागली. त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून ती आपल्या मुलांचे पोट भरत होती. परंतु काही दिवस आजारी असल्यामुळे तिला कामावर जाते आले नाही.

तिच्याकडे मुलांना खायला द्यायला काहीच उरले नव्हते. तिने शेजाऱ्यांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. शेवटी एका व्यक्तीने मदतीचा हात पुढे केला. पण त्या व्यक्तीने प्रेमाला तिचे केस विग बनवण्यासाठी विकण्याचा सल्ला दिला. प्रेमाने त्या व्यक्तीची मदत घेतली आणि केवळ १५० रुपयांना तिचे केस विकले. पण १५० रुपयामंध्ये तिची आणि तिच्या मुलांची केवळ एक दिवसांची भूक भागणार होती. पुढे काय होणार या विचाराने प्रेमा नैराश्यामध्ये गेली आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या बहिणीने तिचा जीव वाचवला.

प्रेमाच्या बहिणीने तिच्या वरिष्ठ सहकऱ्यांना सर्व सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रेमाला मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर अनेकांनी प्रेमासाठी मदतीचा हात पुढे केला. काहींनी प्रेमाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील घेतली. त्यातून त्यांनी १.४५ लाख रुपयांचा निधी गोळा केला. इतकेच नव्हे विधवांना मिळणारे वेतन देखील मिळवून दिले.