केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हे बजेट संसदेत सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली हिंदीत भाषण करणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कारण असं झालं असतं तर इतिहासात पहिल्यांदाच हिंदीत अर्थसंकल्प सादर केला गेला असता. पण अर्थसंकल्पाचं भाषण पूर्णपणे हिंदीत सादर न करता इंग्रजी हिंदी मिश्रीत ‘हिंग्लिश’ भाषण त्यांनी केलं आणि याच ‘हिंग्लिश’ भाषणावरून जेटली सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

एकतर समजायला अवघड आणि त्यातूनही इंग्रजीत अर्थसंकल्प सादर होत असल्यानं एकूण या भाषणाबाबत सर्वसामान्य भारतीयांची उदासीनता असते. म्हणूनच की काय आपलं भाषण जास्त प्रभावी ठरावं यासाठी इंग्रजी आणि हिंदीत संवाद साधण्याचं जेटलींनी ठरवलं. खरतर अर्थसंकल्पीय भाषणात इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषा वापरण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. २०१८ च्या अर्थसंकल्पात कृषी आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं होतं त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यंत पोहोचण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न होता. पण, हा प्रयत्न फारसा प्रभावी ठरलेला दिसला नाही.

Budget 2018 : जेटलींचा अर्थसंकल्प, नेटकऱ्यांचा ‘हास्यसंकल्प’!

Budget 2018: जाणून घ्या, काय स्वस्त काय महाग

त्यातून भाषण करताना हिंदीमिश्रित ‘हिंग्लिश’ मुळे जेटली अनेकदा अडखळले. एकलव्य योजनेबद्दल बोलताना जेटली दोन तिनदा ‘एकलव्य’ या शब्दावर अडखळले. हा शब्द उच्चारताना त्यांना अडचण होत होती. त्यांचा तो केवीलवाणा प्रयत्न पाहून उपस्थितांमध्येही हशा पिकला. त्यामुळे आपल्या भाषणांतून जरी अर्थसंकल्पातल्या तरतूदी शेतकरी आणि सामान्य वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जेटलींनी केला असला तरी सामान्यांना मात्र तो प्रयत्न फारसा भावलेला दिसला नाही.