रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रेल्वेनं प्रवास करून अचानक प्रवाशांना अनपेक्षित धक्का दिला. अचानक रेल्वेमंत्र्यांना ट्रेनमध्ये पाहून प्रवासीही काहीसे गोंधळले. यावेळी पियूष गोयल यांनी प्रवाशांशी संवाद साधत त्यांना प्रवास करताना येत असलेल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतात रेल्वे मार्गाचं जाळं मोठं आहे. रेल्वेचा प्रवास हा तुलनेनं स्वस्त आणि आरामदायी असल्यानं अनेकांची पसंती रेल्वे प्रवासाला असते. पण गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये अनेक असुविधांचा सामाना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहे. रेल्वेमधील भोजनाचा खालावत चाललेला दर्जा, अस्वच्छता अशा शेकडो तक्रारी प्रवासी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडे करत आहे. त्यामुळे सोमवारी अचानक कावेरी एक्स्प्रेसमधून प्रवास करत त्यांनी रेल्वेतील कर्मचाऱ्यांची आणि प्रवाशांची गाठभेठ घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये हमसफर एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवत तिची रवानगी केली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर पियूष गोयल तिथेच थांबले. थोड्याच वेळात स्टेशनवर कावेरी एक्स्प्रेस आली आणि अगदी अनपेक्षितपणे पियूष गोयल ट्रेनमध्ये चढले. त्यांनी ट्रेनमधून मैसूर ते बंगळूरू असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. रेल्वे प्रवासादरम्यान येत असलेल्या अडचणींची विचारणा केली. त्याचप्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्या कामाचीही पहाणी केली. यावेळी अनेक प्रवाशांनी रेल्वेतील असुविधांबाबतच गाऱ्हाणं रेल्वेमंत्र्यांकडे मांडलं.