उदयपूरमध्ये एक केशकर्तनालय आहे. पण या केशकर्तनालयाची अशी ओळख सांगणं चुकीचे ठरेल. कारण हे केशकर्तनालय नसून ते चालवणा-या आनंद सेनने याचे रुपांतर चक्क संग्रहालयात केले आहे. त्यांच्या या केशकर्तनालयात केस कापायला येणा-या प्रत्येकाला त्यांनी जपून ठेवलेल्या विविध वस्तू पाहता येतात.

वाचा : पुरूषांसाठी लढणारी बाई

उदयपूरमध्ये आनंद सेन याने तीस वर्षांपूर्वी केशकर्तनालय उघडले होते. त्यांना विविध वस्तू जमवण्याचा छंद आहे. गेल्या तीस वर्षांत त्यांनी जमवलेल्या विविध वस्तूंची मांडणी शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी या ठिकाणी केली आहे. कुठे जुने शिक्के, नाणी, चलनी नोटा त्यांनी मांडून ठेवल्या आहे तर कुठे अनेक देवदेवतांच्या फोटोंची मांडणी त्यांनी केली आहे. त्यांचे हे केशकर्तनालय पाहण्यासाठी दरदिवशी कित्येक लोक येथे येतात. अनेक विदेशी पर्यटक देखील येतात.

वाचा : अशिक्षित असूनही ६० वर्षांच्या वृद्धाने झोपडीत सुरु केले ग्रंथालय

त्यांचे हे कर्तनालय कम संग्रहालय पाहून ते खूश होतात. काही पर्यटक त्यांना आपापल्या देशांचे चलन देखील देतात. हे पैसे खर्च करण्यापेक्षा ते आपल्या दुकानात सजवून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या केशकर्तनालयात परदेशी चलनचे कलेक्शनही पाहायला मिळते. राजकमल हेअर ड्रेसर म्हणून त्यांचे हे कर्तनालय प्रसिद्ध आहे. तोडक्या मोडक्या इंग्रजीत ते विदेशी पर्यटकांना आपल्या या दुकानाची माहिती देतात. इतकेच नाही तर दरवर्षी ते आपलेही फोटोशूट करून घेतात आणि तेही फोटो संग्रहालयात लावतात.