काही माणसांचं आपल्या पाळीव प्राणी, पक्ष्यांशी एक वेगळंच नातं जोडलं जातं. काहींना तर हे प्राणी, पक्षी आपल्या कुटुंबातील एक भाग वाटू लागतात. त्यांच्याशिवाय घराबाहेर पडण्याची कल्पनाच ते करु शकत नाही, इतकी घट्ट नाळ या मुक्या जीवांशी लोकांची जोडली जाते. नुकताच अमेरिकेतल्या नेवार्क विमानतळावर एक विचित्र प्रकार घडला. या विमानतळावर एक महिला प्रवासी चक्क आपल्या मोराला घेऊन आली.

खरं तर विमानतळावर मोराला पाहून इतर प्रवाशांना थोडा धक्काच बसला पण, ही महिला प्रवासी मात्र काही केल्या ऐकेना. तिनं मोराला प्रवास करता यावा यासाठी चक्क विमानाचं वेगळं तिकिटही काढलं. पण, विमानात मोराला घेऊन प्रवास करण्यासाठी तिला विमानसेवेनं मज्जाव केला. विमानात मोराला प्रवेश मिळणार नाही हे तिला विमानसेवेनं निक्षून सांगितलं पण ही महिला काही ऐकायला तयार होईना. हा मोर पक्षी नसून माझ्यासाठी एक मोठा भावनिक आधार असल्याचं कारण पुढे करत ती मात्र तिथेच उभी राहिली. त्यामुळे मोराला घेऊन विमानप्रवास करण्याची अजब मागणी करणाऱ्या या प्रवाशाला पाहून विमानसेवेच्या अक्षरश: नाकी नऊ आले.