पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थक आणि विरोधक यांच्यातील खडाजंगी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण मोदींवरुन चक्क एका जोडप्याने लग्न मोडलंय. मोदींवरुन तीव्र मतभेद असल्याने उत्तर प्रदेशमध्ये जोडप्याने लग्नाचा निर्णय मोडला. देशाचा आर्थिक विकास संथगतीने होत असल्यावरुन सुरु झालेला हा वाद शेवटी लग्न मोडण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला.

लग्नात मानपान दिला नाही, हुंडा दिला नाही इथपासून ते रसगुल्ला दिला नाही, जेवणात मीठ कमी होते या कारणांपर्यंत लग्न मोडल्याचे आपण नेहमीच वाचतो. पण उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदीमुळे एका जोडप्याचे लग्न मोडले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाचे महिला सरकारी कर्मचाऱ्यासोबत लग्न ठरले होते. सुरुवातीला दोघांमध्ये सारेकाही आलबेल होते. लग्न होणार असल्याने दोन्ही कुटुंब आनंदात होती. पण मोदींचा विषय निघाला आणि या लग्नात मीठाचा खडा पडला. देशाचा आर्थिक विकास मंदावला असून यासाठी मोदीच जबाबदार असल्याचे त्या महिला कर्मचाऱ्याचे म्हणणे होते. तर व्यावसायिक हा कट्टर मोदी समर्थक असल्याने त्याला आपल्या भावी पत्नीचे मत पटले नाही. मोदींवरुन त्या दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे नाव आणि त्यांचे शहर याविषयी वृत्तात उल्लेख नाही. लग्न मोडल्याने दोन्ही कुटुंबांना हादराच बसला आहे.