सुट्टी हवी असेल तर बॉसकडे रजेचा अर्ज करताना अनेकजण कधी कधी खोटी कारणं सांगून रजा मंजूर करुन घेतात. खरं कारण सांगितलं तर सुट्टी थोडीच मिळणार आहे? त्यापेक्षा थाप मारलेली बरी अशी अनेकांची मानसिकता असते. पण उत्तर प्रदेशमधले पोलीस शिपाई सोम सिंह यांनी प्रामाणिकपणा दाखवत सुट्टीमागचं खरं कारण रजेच्या अर्जावर लिहिलं आहे. याच कारणामुळे सोम सिंह यांचा रजेचा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘कुटुंब विस्तारा’साठी आपल्याला ३० दिवसांची सुट्टी हवीय असं कारण त्यानं अर्जात लिहिलं आहे.

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात कोतवाली पोलिस ठाण्यात सोम सिंह तैनात आहेत. ‘कुटुंब विस्तारा’साठी आपल्याला सुट्टी देण्यात यावी असा अर्ज त्यांनी वरिष्ठांकडे केला होता. विशेष म्हणजे त्याचं कारण पाहत ३० नाही तर तब्बल ४५ दिवसांची सुट्टी त्यांना मंजुर करण्यात आली आहे. हा अर्ज व्हायरल होऊ नये यासाठी रजेचं कारण बदलून पुन्हा अर्ज करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचं समजत आहे.

उत्तर प्रदेश पोलीस दलातील पोलिसांनी यापूर्वी अनेकदा सुट्ट्या मिळत नाही, अशी खंत बोलून दाखवली होती. खरं कारण दिलं तर कदाचित आपल्या सुट्टी मिळेल इतकी आशा मनात बाळगून त्यांनी अर्ज केला असल्याचं म्हटलं जात आहे.