पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले असून चीनचंही नुकसान झालं आहे. यानंतर भारतात चीन विरोधात संताप व्यक्त केला असून त्यांच्या मालावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशातील अलिगड येथील काही मुलांनीही आपल्याप्रमाणे शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चीनला धडा शिकवण्याचा निर्धार केला. पण ही मुलं थेट सीमारेषेवर जाण्यासाठी घर सोडून निघाली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर या मुलांना रोखलं. मुलांकडे विचारणा केली असता आपण चीनच्या सीमारेषेवर चाललो असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं.

मुलांना कुठे चालला आहात ? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “आपल्या जवानांची हत्या केल्याबद्दल चीनचा बदला घ्यायचा आहे”. मुलांचं उत्तर ऐकून पोलीसही चक्रावले होते. मुलांचं देशप्रेम पाहून त्यांनी त्यांचं कौतुक केलं. पण यावेळी त्यांनी मुलांना समजावलं आणि पुन्हा आपल्या घरी पाठवलं.