तुम्ही कधी विंडो सीटसाठी भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर भांडण केले आहे का? अर्थात याचे उत्तर होच असेल कारण सर्वांनाच विंडोसीटवर बसून प्रवास करायला आवडतं. मात्र विंडोसीटवरुन दोन पोलिसांमध्ये हाणामारी झाली तर? आता तुम्हाला ही एखादी काल्पनिक गोष्ट वाटेल मात्र खरोखरच उत्तर प्रदेशमध्ये असा प्रकार घडल्याच समोर आलं आहे. गस्त घालणाऱ्या गाडीमध्ये पुढे विंडोसीटवर कोण बसणार यावरुन दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील बितूर येथे तैनात असणाऱ्या ‘डायल १००’ गस्ती पथकातील पोलिसांच्या गाडीमधील हवलदारांमध्ये ही हणामारी झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. राजेश सिंह (चालक) आणि सुनील कुमार या दोन हवलदारांमध्ये पुढच्या सीटवर कोण बसणार यावरुन बाचाबाची सुरु झाली. त्यानंतर या वादाचे रुपांतर हणामारीमध्ये झाले. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या इतर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकमेकांना शिव्या देण्यापासून सुरु झालेल्या वादानंतर या दोघांनी एकमेकांवर हात उचलला. रस्त्याच्या मध्यभागी हे दोघे एकमेकांना शिव्या घालत मारहाण करत होते. या हणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस खात्याने दोघांवर गैरवर्तनाचा ठपका ठेवत निलंबित केलं आहे.

याआधीही उत्तर प्रदेशमधील दोन पोलिसांमध्ये लाच म्हणून मिळालेले पैसे वाटून घेण्यावरुन मारामारी झाली होती.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांमध्येच वाद होण्याच्या घटना वाढत असून त्यामुळे खात्याचे नाव खराब होत असल्याची चर्चा सुरु आहे.